एमजीएम रूग्णालयात नमुंमपाच्या 20 आयसीयू बेड्सची सुविधा

नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांवरील उपचारासाठी त्यांच्या लक्षणांच्या स्वरूपानुसार योग्य बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी, रूग्णसंख्या वाढणार असल्याचा अंदाज येऊ लागताच, तत्परतेने आधीपासूनच सुरूवात करण्यात आलेली आहे. यामध्येही विशेषत्वाने आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन खाजगी रूग्णालयांतील आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची वाढ करण्याकडे लक्ष देण्यासोबतच महानगरपालिकेच्या कोव्हीड सुविधांमधील आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स संख्येत वाढ केली जात आहे.

 सध्या नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील रूग्णालयात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 200 आयसीयू बेड्स आणि 80 व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. महानगरपालिकेच्या या सुविधेत वाढ करण्याच्या दृष्टीने आता कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात नियोजित 100 आयसीयू बेड्स आणि 40 व्हेंटिलेटर्सपैकी पहिल्या टप्प्यात 20 आयसीयू बेड्स आणि 10 व्हेटिलेटर्सची सुविधा कार्यान्वित झालेली आहे.

13 एप्रिलला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील कामाची पाहणी करून लवकरात लवकर ही सुविधा नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले होते. त्यास अनुसरून कालबध्द काम करीत चारच दिवसात 20 आयसीयू बेड्ससह 10 व्हेटिलेटर्सची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे आयसीयू बेड्स व व्हेटिलेटर्स उपलब्धतेमध्ये होणारी कोरोना बाधितांची अडचण काही प्रमाणात दूर होणार आहे. आगामी 10 दिवसांच्या कालावधीत उर्वरित आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहेत.