दलालांना चाप; पनवेल आरटीओच्या प्रवेशद्वारावरच अधिकारी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2026
- 24
प्रादेशिक अधिकारी जयंत चव्हाण यांचा पुढाकार; नागरिकांशी थेट संवाद साधून कागदपत्रांची तपासणी
पनवेल : आरटीओ कार्यालयातील कामांसाठी दलालांवर अवलंबून राहावे लागत असल्याच्या तक्रारींची दखल घेत पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. प्रादेशिक अधिकारी जयंत चव्हाण यांनी स्वतः कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसून नागरिकांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या कामाची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रे तपासल्यानंतरच त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जात आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरटीओ कार्यालयांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार परिवहन आयुक्तांनीही सर्व कार्यालयांना सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल आरटीओने नागरिकांची मध्यस्थांकडून होणारी दिशाभूल आणि आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. आरटीओ कार्यालयातील कामे करून देण्याच्या नावाखाली मध्यस्थांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात. या पार्श्वभूमीवर पनवेल आरटीओने नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधता यावा, यासाठी प्रवेशद्वाराजवळच मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जयंत चव्हाण प्रवेशद्वारावर बसून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतात. दररोज दीडशेहून अधिक वाहनमालक कार्यालयात येतात. त्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन संबंधित विभागात पाठवले जाते. यासाठी स्वतंत्र नोंदवहीही ठेवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे दलालांची गर्दी कमी होऊन नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधता येत आहे.
नोव्हेंबर 2010 मध्ये स्थापन झालेल्या पनवेल आरटीओमध्ये आतापर्यंत सहा लाख 16 हजार वाहनांची नोंदणी झाली आहे. वाढत्या कामाचा ताण लक्षात घेता परिवहन विभागाने अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. वाहन प्रणालीतील 88 पैकी 42, तर सारथी प्रणालीतील 27 पैकी 23 सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. वाहन हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्र, शिकाऊ परवाना आणि परवाना नूतनीकरण यांसारखी कामे घरबसल्या करता येतात. ज्या कामांसाठी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे, त्यासाठीच कार्यालयात यावे. दलालांच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत ऑनलाइन सेवांचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai