कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी नवी मुंबई पालिका सज्ज

खासदार राजन विचारे यांनी केली एक्झिबिशन सेंटरची पाहणी

नवी मुंबई ः खासदार राजन विचारे यांनी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरला भेट देऊन रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण, मृत्युदर, दररोज होणार्‍या चाचण्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयु बेड्सची माहिती घेतली. तसेच संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई पालिकेने तयारी केली असून त्याचाही आढावा विचारे यांनी घेतला. 

देशात व राज्यात कोरोना महामारी ने पुन्हा डोकं वर काढलेले असताना नवी मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये आयसीयू ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्तांचे तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वेळोवेळी लाभणार्‍या सहकार्याबद्दल विचारे यांनी आभार व्यक्त केले. या कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता दाट दर्शवली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा समावेश असू शकतो असा अंदाज दर्शविला जात आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनीही त्याचे नियोजन करण्याचे काम सुरू केले आहे. त्याची पूर्व तयारी करणे ही तितकेच गरजेचे आहे. यासाठी खासदार विचारे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना पत्राद्वारे वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये लहान  मुलांसाठी वेगळा कक्ष बनवून त्यामध्ये 300 ऑक्सिजन व 200 आय सी यु बेड उपलब्ध करून ठेवण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेने याची तयारी सुरू केली असताना विचारे यांनी सदर जागेची पाहणी करून त्याचा आढावा घेतला. तसेच या पाहणी दौर्‍यात त्यांनी कोव्हीड वॉर्डला व मेडिकल फार्मसीला भेट देऊन उपस्थित असलेल्या नर्सेस व स्टाफ कर्मचार्‍यांची विचारपूस करून त्यांचे मनोधैर्य वाढविले.