विष्णुदास भावे नाट्यगृहात जम्बो लसीकरण केंद्र

नवी मुंबई ः 31 जुलैपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील 45 वर्षांवरील 100 टक्के व्यक्तींना कोव्हीड लसीचा किमान एक डोस तरी दिला पाहिजे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून नियोजन करण्यात येत आहे. त्याकरिता लसीकरण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने एक विशेष जम्बो लसीकरण केंद्र वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारपासून सुरु करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असला तरी लसी उपलब्ध झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये व लसीकरणाची कार्यवाही लगेच सुरू करता यावी यावर आयुक्तांचा विशेष भर असून त्यादृष्टीने नागरिकांना सुविधाजनक नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. विष्णुदास भावे नाट्यगृहात सुरु करण्यात आलेल्या जम्बो लसीकरण केंद्रात दररोज 1000 व्यक्तींना लसीकरण करण्याची क्षमता असून मंचावर लसीकरण बूथ व प्रेक्षागृहातील आसनांच्या ठिकाणी प्रतिक्षा आणि निरीक्षण कक्षाची रचना करण्यात आलेली आहे. सध्या  32 ठिकाणी लसीकरण केले जात आहे. त्यामध्ये आता विष्णुदास भावे नाट्यगृहातील जम्बो लसीकरण केंद्राची भर पडलेली आहे. याशिवाय लसीकरण केंद्रात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने विविध विभागांत 50 समाजमंदिरे, शाळांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे.  

संपूर्ण वातानुकूलीत असलेले विष्णुदास भावे नाट्यगृहातील लसीकरण केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण असून इतर लसीकरण केंद्रांवरही मे महिन्यातील उन्हाळा लक्षात घेता तसेच सध्या तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पडलेला पाऊस आणि आगामी पावसाळी कालावधीचा अंदाज घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी मंडप घालण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याठिकाणी खुर्च्या आणि पंख्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान (84 ते 112 दिवसांदरम्यान) घ्यावयाचा असून कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस पूर्वीप्रमाणेच 4 ते 6 आठवड्यांदरम्यान (28 ते 42 दिवसांदरम्यान) घ्यावयाचा आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 2 लक्ष 57 हजार 808 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यामधील 92 हजार 736 नागरिकांनी लसीचा दुसराही डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण 3 लक्ष 50 हजार 544 लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.