नाले व गटारे सफाईची 85 टक्के कामे पुर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- May 25, 2021
- 626
आयुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी ; 31 मे डेडलाईन असल्याने गतीमानतेने काम करण्याचे निर्देश
नवी मुंबई ः शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागांच्या आढावा बैठकींमध्ये पावसाळापूर्व कामांबाबत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी विविध ठिकाणांना भेट देत नैसर्गिक नालेसफाई तसेच पावसाळी गटारे साफसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. 85 टक्के कामे पुर्ण झाली असून सर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण व्हावेत यादृष्टीने गतीमानतेने काम करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
नेरुळ विभागात हर्डेलिया कंपनीजवळून जाणारा मोठ्या नैसर्गिक नाल्यामध्ये सायन पनवेल महामार्गाखाली डोंगरातून वाहून येणारी माती व दगड साठल्याने त्या भागाची साफसफाई स्किड स्टियर लोडर या वेगळ्या प्रकारच्या यांत्रिक वाहनाव्दारे करण्यात येत असून ते काम जलद पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सायन पनवेल महामार्गाला समांतर जाणार्या कल्व्हर्ट बांधणीचे कामही गतीने पूर्ण करावे असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे रहेजा जवळील नाल्याचीही साफसफाई गतीने पूर्ण करावी त्यासाठी आवश्यकतेनुसार कामगार वाढविण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या. महापालिका क्षेत्रातील सर्व मोठ्या नाल्यांची साफसफाई कामे कोणत्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत पूर्ण करावी असे आयुक्तांनी पाहणीमध्ये निर्देशित केले.
एलपी जंक्शनजवळ सायन पनवेल रस्त्याखालून शिवाजी नगर शिरवणे एमआयडीसीकडे जाणार्या कल्व्हर्टचे काम साफसफाई तातडीने करून प्राधान्याने पूर्ण करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. वाशी सेक्टर 17 येथील सर्वात मोठा नाला सफाईबाबत अधिक संख्येने पोकलेन लावून तत्परतेने सफाई करावी असे निर्देशित करताना महापालिका क्षेत्रातील होल्डींग पॉँडवरील सर्व फ्लॅपगेट नवीन टाकून अथवा दुरुस्त करून कार्यान्वित राहतील याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. वाशी सेक्टर 8 आणि सीबीडी बेलापूर सेक्टर 11 येथील पंपींग हाऊसच्या ठिकाणी भरतीच्या व पावसाच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पंप कार्यान्वित ठेवण्यात अडचण येऊ नये याकरिता त्याठिकाणी अतिरिक्त इलेक्ट्रीकल बॅकअपची व्यवस्था करण्याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. कोपरखैरणे विभागात पावसाळी गटरांच्या सफाईची पाहणी करताना आयुक्तांनी साफसफाईचे परिमाण जाणून घेतले. सेक्टर 12 ए कोपरखैरणे तसेच सेक्टर 12 घणसोली येथील एमआयडीसीतून येणार्या मोठ्या नाल्याची पाहणी करताना आयुक्तांनी मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेप्रमाणेच विशेषत्वाने छोट्या नाल्यांच्या सफाईकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते तेथील साफसफाईवर व पाणी साचू नये यासाठी करावयाच्या पंपींग व इतर व्यवस्थेची दक्षता घेण्याचे सूचित केले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नैसर्गिक नालेसफाई व पावसाळी गटारे सफाईची कामे साधारणत: 85 टक्के पूर्ण झाली असून सर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण व्हावेत यादृष्टीने गतीमानतेने काम करावे असे आयुक्तांनी निर्देश दिले व पुन्हा या कामांची पाहणी करणार असल्याचेही सूचित केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai