शहरातील हायमास्ट बंद

नवी मुंबई : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील विविध भागातील चौकांमध्ये उभारलेले हायमास्ट गेले अनेक दिवसांपासून बंद आहेत. मात्र, सदर दिव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करून देखील हायमास्ट दिवे बंद असल्याने देखभाल दुरुस्तीचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नवी मुंबईतील नागरिकांना पडला आहे.  

महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच चौकांत शहराचा नावलौकिक वाढवा म्हणुन विद्युत रोषणाई करणारे उंच दिवे (हायमास्ट) लावले आहेत. परंतु, वाशी रेल्वे स्टेशन, वाशी हायवे, सानपाडा, नेरुळ, उरण फाटा, सिबीडी आदी ठिकाणी उभारलेले हायमास्ट दिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे करून देखील प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अनेक नागरिक करत आहे. या बंद दिव्यांमुळे नवी मुंबई शहराचे सौंदर्य लयास गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांकडून चैन स्नॅचिंग, लुटमारी आदी घटना घडत असून नागरिक हैराण झाले आहेत. त्यावर आवर घालण्यासाठी लवकरात लवकर बंद असलेले हायमास्ट चालू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.