पायाभूत सुविधासाठी संमतीपत्र सादर करा

नैना क्षेत्रातील जमीन मालकांना सिडकोचे आवाहन

नवी मुंबई ः नगर रचना परियोजना क्र. 4 ते 11 या जमीन मालकांच्या मागणीच्या प्राधान्याप्रमाणे हाती घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. नगर रचना परियोजना ताबडतोब अंमलात आणण्यासाठी जमिन मालकांनी आपले संमपतीपत्र नैना कार्यालयास सादर करावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संख्येने प्रथम संमती कळवतील, अशा जमीन मालकांच्या परियोजना प्राधान्याने सुरू करता येतील. या संदर्भातील जाहीर सूचनो प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत हे संमपतीपत्र सादर करायचे आहे. 

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई विमानतळाभोवतालच्या 672 चौ.कि.मी. च्या प्रदेशात नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र प्रकल्पाद्वारे एक अत्याधुनिक व सुनियोजित शहर विकसित करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाच्या मंजूर अंतिम विकास आराखड्यातील 23 गावांचा विकास हा एकूण 11 नगर रचना परियोजनांच्या (टीपीएस) माध्यमातून करण्यात येत आहे. त्यांपैकी 1 ते 3 योजना मंजूर झाल्या असून त्यांवर विविध स्तरावर कार्यवाही सुरू आहे. नगर रचना परियोजनांमध्ये सहभागी जमीन मालकांना त्यांच्या मूळ जमिनीच्या 40% विकसित भूखंड हा अंतिम भूखंड म्हणून देण्यात येणार असून या भूखंडाकरिता मूळ जमिनीएवढाच चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय असणार आहे. यामुळे जमीन मालकांना त्यांच्या जमिनीकरिता पूर्ण मोबदला मिळणार आहे. उर्वरित 60% जागेवर सिडकोकडून रस्ते, खेळाचे मैदान, बगिचा, शाळा, ग्रोथ सेंटर इ. सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. जमीन मालकाची जमीन कुठल्याही आरक्षणाने बाधित होणार असली तरी त्यांना 40% भूखंड मिळणार आहे. नगर रचना परियोजना क्र. 4 ते 11 या जमीन मालकांच्या मागणीच्या प्राधान्याप्रमाणे हाती घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. जे जमीन मालक/शेतकरी/खातेदार जास्तीत जास्त संख्येने प्रथम संमती कळवतील, अशा परियोजना प्राधान्याने सुरू करता येतील.  या अनुषंगाने नगर रचना परियोजना क्र. 4 ते 11 अंतर्गत गावांतील समाविष्ट असलेल्या सर्व्हे क्रमांकांची यादी व खातेदारांची नावे सिडकोच्या संकेस्थळावर जोडण्यात (अपलोड) आली आहे. सदर योजनांची अंमलबजावणी व त्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास शीघ्र गतीने व्हावा, याकरिता संबंधित जमीन मालकांनी तत्काळ आपले संमतीपत्र देणे आवश्यक आहे. त्यानुसार ज्या खातेदारांचा नगर रचना परियोजना क्र. 4 ते 11 मध्ये समावेश आहे, त्यांनी उपरोक्त संकेस्थळावर जोडण्यात आलेले संमतीपत्र सर्व खातेदारांच्या स्वाक्षरीने, संमतीत्रप सादर करण्यासंदर्भातील सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (नैना) यांचे कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून अथवा पोस्टाद्वारे निर्धारित कालावधीत सादर करण्याचे आवाहन सिडकोने केले आहे. 

नगर रचना परियोजनांच्या व एकंदर नैना प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीकरिता जमीन मालकांनी लवकरात लवकर संमती कळविण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. यामुळे जमीन मालकांना, त्यांना वाटपित करण्यात आलेल्या जमिनीवर विकासकामे हाती घेणे शक्य होऊन त्यांच्या जमिनीकरिता अल्पावधीतच मागणी वाढेल. 
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको