नवी मुंबईत घरवापसीचे वेध; ठाण्यातील नेत्यांच्या कार्यशैलीवर नाराजी

नवी मुंबई ः आ. गणेश नाईकांच्या कार्यशैलीला कंटाळून अन्य पक्षात प्रवेश केलेल्या अनेक नगरसेवकांचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेत गेलेले अनेक नगरसेवक ठाण्यातील नेत्यांच्या कार्यशैलीला आताच कंटाळले असून त्यांनी घरवापसीचे संकेत दिल्याने नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान, सन्मानाने आपल्याला परत घ्यावे अशी अट या नगरसेवकांनी घातल्याचे सुत्रांकडून कळत आहे. 

आ. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात केलेला प्रवेश अनेक नगरसेवकांना खटकला होता. नाईकांच्या कार्यशैलीला आणि घराणेशाहीला कंटाळल्याची चर्चा काही नगरसेवक खाजगीत करत होते. परंतु नाईकांची साथ सोडण्याची हिम्मत एकाही नगरसेवकाने दाखवली नव्हती. महाराष्ट्रात सत्ताबदल होताच नवी मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल असे जाहीर झाल्याने अनेक नगरसेवकांनी पक्षांतर केले. त्यामध्ये तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी, दिघ्यातील नवीन गवते यांनी शिवसेना जवळ केली तर दारावे येथील संदीप व सलूजा सूतार तसेच वाशीतील वैभव आणि दिव्या गायकवाड, नेरुळ येथील तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीला जवळ केले. सुरेखा नरबागे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला परंतु लगेचच भाजपात परतल्या. या सर्वांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षांतर केले परंतु, अजूनही निवडणुकीचे पडघम वाजत नसल्याने सर्वांमध्ये अस्वस्थता आणि बेचैनी आहे. 

भाजपा आणि महाविकास आघाडीने निवडणुकीपुर्वी खाजगी संस्थामार्फत जनमत चाचणी केली असून अधिकतर लोकांनी गणेश नाईक यांना पसंती दिल्याचे बोलले जात आहे. या पार्श्‍वभुमीवर लवकर निवडणुका न घेणे ही रणनिती महाविकास आघाडीने रचल्याचा आरोप नाईक वर्तुळातून केला जात आहे. त्यातच लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाने कोट्यावधी रुपयांची कामे काढली असून भविष्यात निवडून आल्यावर पालिकेत निधी शिल्लक राहील का? ही चिंता संबंधितांना सतावत आहे. त्यातच नवी मुंबई महापालिकेत ठाण्यातील ठेकेदारांचा वावर वाढल्याने नगरसेवकांना या ठेकेदारांशी जुळवून घेणे कठिण जात आहे. याबाबत काही नगरसेवकांनी ठाण्यातील नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता रात्री 1-2 वाजल्याशिवाय भेट शक्य होत नसल्याने नवी मुंबईतील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यापुर्वी या नगरसेवकांना गणेश नाईकांची भेट कधीही आणि कुठेही घेता येत होती आणि आपल्या प्रभागातील कामांसाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन होत होते. परंतु, नवीन राजकीय समीकरणात या नगरसेवकांची अवस्था ‘न घर का न घाट का’ अशी झाल्याने त्यांची विमाने जमीनीवर उतरली आहेत. या नगरसेवकांनी आता घरवापसीचे संकेत दिले असून आपल्या सन्माननीय वापसीसाठी हालचाली सुरु केल्या असल्याचे सुत्रांकडून कळत आहे.