Breaking News
घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई ः कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असलेल्या रायगडसह 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. आपल्या जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करु नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांशी आज (24 जून) ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे ही उपस्थित होते. दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरुन आपल्याला तिसर्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचाही धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील? तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील? याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, दुसर्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करु नका, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विशेषतः दुसर्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करुन ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बर्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बोलताना सांगितले की, राज्यातील 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील 3 जिल्हे कोकण (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), 3 पश्चिम महाराष्ट्र (सातारा, सांगली, कोल्हापूर) आणि एक मराठवाड्यातील (हिंगोली) जिल्हा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल. तसेच या जिल्ह्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील असे सांगितले. आरटीसीपी चाचणी वाढविणे, वाड्यावस्त्यांमध्ये कंटेनमेंट उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविणे, याकडे सर्वांनीच लक्ष द्यावे, असे मुख्य सचिव यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai