बेघर निराधार व्यक्तींचे कोव्हीड लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 26, 2021
- 548
पुढील दहा दिवसात पालिकेच्या आठही विभागांत निराधार बेघरांसाठी कोव्हीड लसीकरणाची विशेष मोहीम
नवी मुंबई ः कोरोनाच्या तिसर्या लाटेला सामोरे जात असताना लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. निवारा नसणार्या रस्ते, उड्डाणपुलाखालील जागा येथे आढळणार्या बेघर निराधार व्यक्ती असे दुर्लक्षित घटक लसीकरणापासून वंचित राहू नयेत याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बारकाईने लक्ष दिले जात असून पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार पालिका क्षेत्रातील निराधार बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पुढील दहा दिवसात पालिकेच्या आठही विभागांत निराधार बेघरांसाठी कोव्हीड लसीकरणाची ही विशेष मोहीम राबविली जाणार असून गुरुवारी बेलापूर विभागापासून लसीकरणास सुरूवात करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे निराधार बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे.
लसीकरणात कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असून वृध्दाश्रम, अनाथाश्रमात असलेले बेडवरील रूग्ण, वृध्द तसेच दिव्यांग व्यक्ती यांच्याकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. आता बेघर निराधार व्यक्तींचे लसीकरण पालिकेने सुरु केले आहे. समाजविकास व आरोग्य विभागामार्फत आयुक्तांच्या निर्देशानुसार मागील 15 दिवसांपासून या मोहिमेच्या नियोजनाचे काम सुरू करण्यात आले असून समाजविकास विभागातील समुह संघटकांमार्फत प्रत्येक विभागातील 8 ते 10 ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणांवर जाऊन लसीकरण करण्यासाठी डॉक्टर व नर्सेससह विशेष आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले असून सदर पथक निश्चित केलेल्या ठिकाणांवर रूग्णवाहिकेतून जाऊन समुह संघटकांनी त्याठिकाणी एकत्र केलेल्या निराधार बेघर व्यक्तींचे लसीकरण करीत आहे. अशा बेघर निराधारांकडे कोणताही कागदपत्रांचा पुरावा नसल्याने मशीनव्दारे अशा व्यक्तींच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांच्या नावाची शासकीय पोर्टलवर एन्ट्री करण्यात येत आहे. हे बोटांचे ठसे त्यांच्या दुसर्या डोसवेळी ओळख पटविण्यासाठी महत्वाचे असणार आहेत.लसीकरणासाठी आणलेल्या बेघर निराधार व्यक्तीसाठी लसीकरणाची रूग्णवाहिका उभी असेल त्याठिकाणी प्रथमत: हात धुण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यांच्याकरिता चहा, बिस्कीट व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर मशीनवर त्यांच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांच्या नावाची शासकीय पोर्टलवर रितसर नोंदणी करून त्यांचे लसीकरण केले जात आहे व त्यांना 30 मिनीटे निरीक्षणासाठी थांबविण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांना मास्कचा वापर करणे आणि इतर कोव्हीड सुरक्षा नियम पालनाविषयी माहिती दिली जात असून त्याचे पालन करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे.
103 व्यक्तींचे समुपदेशन
बेलापूर विभागात विविध 19 ठिकाणी 103 निराधार बेघर व्यक्तींचे लसीकरणाविषयी समुपदेशन करण्यात आले असून त्यामधील 14 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आलेले आहे. रेल्वे स्टेशन्स, उड्डाणपुलाखालील जागा, धार्मिक स्थळांबाहेरील जागा अशा बेघर निराधार व्यक्ती आढळणार्या प्रत्येक विभागातील जागांचा समुह संघटकांमार्फत शोध घेण्यात आला असून त्याठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai