मुजोर शिक्षणसंस्था व चालकांवर कारवाई करा

युवसेनेची गटशिक्षण अधिकार्‍यांकडे मागणी

पनवेल : सध्याच्या कोविड महामारी काळात अनेक नागरिकांनी आपले व्यवसाय तसेच नोकर्‍या गमावल्या आहेत. सर्वांनाच आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यात पनवेल क्षेत्रातील अनेक शाळा संस्थानी पालकांना नोटीस पाठविणे तसेच तडकाफडकी शाळेतून काढून टाकणे असे जुलमी निर्णय घेतले आहेत. सदर कृती सरकारी अध्यादेशांचीही पायमल्ली करणारी असून याचा पालक व विद्यार्थ्यांना मानसिक त्रासही होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय करणार्‍या मुजोर शिक्षणसंस्था व चालकांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेने केली आहे.

पनवेल परिसरात शिक्षणसंस्थाकडून विद्यार्थ्यांवर अन्यायाच्या कृतीविरोधात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली व युवासेना सचिव, कॉलेज कक्षप्रमुख वरुण सरदेसाई ह्यांच्या आदेशानुसार जिल्हा समन्वयक नितिन पाटिल व विधानसभा अधिकारी पराग मोहिते ह्यांच्यासह युवासेना शिष्टमंडळाने पनवेल गटशिक्षण अधिकारी महेश खामकर ह्यांची भेट घेत मुजोर शिक्षणसंस्था व चालकांवर तातडीने कारवाई करून शासकीय नियमांनुसार समज द्यावी अन्यथा सरकारकडून सवलती मिळवून जर मुजोर संस्थाचालक जनतेवरच अन्याय करणार असतील तर युवासेना ते चालू देणार नाही व अशा संस्थावर युवासेनेच्या माध्यमातून उग्र आंदोलन केले जाईल असेही युवासेनेच्या माध्यमातून कळविण्यात आले. ह्यावेळी उपविधानसभा अधिकारी अरविंद कडव, उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, शहर अधिकारी निखिल भगत, शहर अधिकारी जय कुष्टे, विभाग अधिकारी जीवन पाटिल, सुयश बंडगर, सौरभ म्हामुणकर आदी उपस्थित होते.