554 सोसायटी वॉचमनचे लसीकरण

नवी मुंबई ः कोव्हीड लसींच्या उपलब्धतेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण प्रक्रियेला वेग  दिला जात आहे. विविध सेवा पुरविताना नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येणार्‍या कोव्हीडच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत असून या अनुषंगाने सोसायट्यांच्या वॉचमेनसाठी विशेष लसीकरण सत्र ऐरोली आणि नेरूळ येथील महापालिका सार्वजनिक रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते. यात 554 जणांचे लसीकरण करण्यात आले. 

कोणताही सामाजिक घटक लसीपासून वंचित राहू नये याची काळजी घेत कॉरी क्षेत्र, रेडलाईट एरिया, तृतीयपंथी तसेच रस्त्यांवरील निराधार बेघर यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सेवा पुरविताना ज्यांचा नागरिकांशी अधिक संपर्क येतो अशा कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत केमिस्ट, मेडिकल स्टोअर्स, रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर, मध्ये काम करणारे कर्मचारी तसेच रिक्षा - टॅक्सी चालक यांच्याप्रमाणेच आज सोसायट्यांच्या वॉचमनकरिताही लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. नेरूळ सेक्टर 15 येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय येथील विशेष लसीकरण सत्रात 346 सुरक्षारक्षकांनी तसेच सेक्टर 3 ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णालयातील विशेष लसीकरण सत्रात 208 सुरक्षारक्षकांनी लसीकरण करून घेतले. अशाप्रकारे  एकूण 554 सोसायटी वॉचमेन यांनी कोव्हीड लसीकरणाचा लाभ घेतला.

काही कारणांमुळे लसीकरणासाठी उपस्थित राहू न शकलेल्या उर्वरित वॉचमेनकरिता पुन्हा लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्विगी, झॉमॅटो, कुरिअर अशा सेवा क्षेत्रातील कर्मचारी, मार्केटमधील विक्रेते यांच्याकरिताही विशेष सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. लसीकरणाला अधिक वेग येण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लस खरेदीची प्रक्रियाही सुरू असून अधिक लस उपलब्ध झाल्यानंतर लगेच जलद लसीकरण सुरू करता यावे याकरिता शंभरहून अधिक केंद्रांचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणासाठी पात्र वयोगटाच्या प्रत्येक नागरिकाने लवकरात लवकर लसीकरण करून घेऊन संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.