सराईत मोबाईल चोर महिलेला अटक

नवी मुंबई ः लोकल मधील महिला प्रवाशांच्या सॅकबॅग मधील मोबाईल फोन चोरणार्‍या एका सराईत मोबाईल चोर महिलेला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. राजश्री सिकंदर शिंदे (29) असे या महिलेचे नाव असून तिच्यावर कुर्ला, बांद्रा, बोरिवली व वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. 

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्धीत महिला प्रवाशांच्या सॅकबॅग मधील मोबाईल फोन चोरीच्या गुह्यात वाढ होऊ लागल्याने अशा चोर्‍या करणार्‍या चोरट्याचा शोध घेण्याच्या सुचना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून देण्यात आल्या होत्या. यादरम्यान वाशी रेल्वे स्थानक परिसरामध्ये एक महिला लहान मुलीसह संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती वाशी रेल्वे स्थानक सोसायटीचे सुरक्षा प्रमुख चंद्रकांत चाळके यांनी दिली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने वाशी रेल्वे स्टेशन बाहेरील आवारातून सदर महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता, तीचे नाव राजश्री शिंदे असल्याचे व ती बांद्रा खेरवाडी येथे राहत असल्याचे तीने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तीला वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात आणुन तीची झडती घेतली असता, तिच्याजवळ दोन मोबाईल फोन आढळुन आले. दरम्यान, राजश्री शिंदे हिने कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये ज्या महिलेचा मोबाईल फोन जबरदस्तीने लुटला होता, त्या फॅमिदा मोहम्मद हनीफ हन्नुरे त्याचवेळी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या असताना, त्यांनी राजश्रीला ओळखुन तीनेच तिच्या सॅक बॅगमधून मोबाईल फोन चोरल्याचे व त्यांनी राजश्रीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, राजश्रीने त्यांना ढकलुन पलायन केल्याचे सांगितले. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी राजश्री हिला जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात तसेच सीसीटीव्ही फुटेजवरुन राजश्री हिने वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे दोन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर महिला सराईत मोबाईल फोन चोर असून तिच्यावर कुर्ला, बांद्रा, बोरीवली व वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु केसरकर यांनी दिली. सदरची कारवाई महिला पोलीस निरीक्षक मोनाली घरटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे, खोतकर, हेड कॉन्स्टेबल सतीश पवार व आदींच्या पथकाने केली.