सोनसाखळी चोरणारी दुकली अटकेत
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 28, 2026
- 25
सहा गुन्ह्यांची उकल, दोघांना अटक, 7.39 लाखांचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर, कोपरखैरणे आणि रबाळे परिसरात सोनसाखळी चोरी व जबरी चोरीच्या घटना घडविणाऱ्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखा कक्ष-1, वाशीच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल सहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली असून, आरोपींकडून 7 लाख 39 हजार 627 रुपये किमतीच्या सहा सोन्याच्या साखळ्या तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नौशाद मुस्ताक आलम ऊर्फ सागर (32) आणि प्रशांत राजू मगर ऊर्फ प्रशांत भगवान वाघमारे ऊर्फ प्रशांत बबन वाघमारे (36) यांचा समावेश आहे. या दोघांना 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खारघर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. फुटेजमध्ये दिसून आलेला आरोपींचा पेहराव तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटारसायकलीच्या आधारे पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा केली. त्यानंतर संशयित आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिस तपासात हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी नौशाद याच्याविरुद्ध यापूर्वी घरफोडी, चोरी आणि सोनसाखळी जबरी चोरीचे तब्बल 41 गुन्हे, तर आरोपी प्रशांत याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कौशल्यपूर्ण चौकशीदरम्यान आरोपींनी खारघर, कोपरखैरणे आणि रबाळे परिसरात आणखी पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे खारघरमधील एक, कोपरखैरणेतील तीन आणि रबाळेतील दोन अशा एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींकडून 69.950 ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या साखळ्या, ज्यांची किंमत 7 लाख 39 हजार 627 रुपये आहे, तसेच 35 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai