90 अंशात कललेली मान केली सरळ

7 वर्षीय सौम्यावर अपोलेने केली यशस्वी शस्त्रक्रिया

नवी मुंबई : गुजरात, वलसाड मधील 7 वर्षांची मुलगी सौम्या तिवारीच्या मानेमध्ये तंतुमय ट्युमर असल्याने तिची मान 90 अंशात कललेली होती. सलग दोन शस्त्रक्रिया करून देखील हा ट्युमर काढता आला नव्हता. परंतु, अपोलो हॉस्पिटलच्या स्पेशलाइज्ड मल्टी-डिसिप्लिनरी टीमने तिच्यावर अतिशय गुंतागुंतीची, अनेक टप्प्यांचा समावेश असलेली यशस्वी शस्त्रक्रिया करुन कललेली मान सरळ केली आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाण्याची ही पहिलीच वेळ होती.

मान कलती करणारा आणि फिरवण्यात अडथळा आणणारा हा ‘ट्युमर टॉर्टिकॉलीस’ म्हणून ओळखला जातो,  पण या मुलीच्या बाबतीत स्नायू कॅल्सिफाय (पेशीजालात कॅल्शियम साठणे) झालेले होते आणि कॉलर हाड व कवटीचे हाड हे एका अस्थिमय पट्टीने एकत्र जुळले होते, त्यामुळे तिचे डोके तिच्या शरीराला अशा पद्धतीने जोडले गेले होते की तिला डोक्याची काहीच हालचाल करता येत नव्हती. अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे स्पेशलाइज्ड मल्टी-डिसिप्लिनरी टीमने या 7 वर्षाच्या मुलीवर अतिशय गुंतागुंतीची, अनेक टप्प्यांचा समावेश असलेली शस्त्रक्रिया केली. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे येण्याआधी साडेपाच वर्षे ही मुलगी हा त्रास सहन करत होती. शेवटची आशा म्हणून तिचे कुटुंबीय तिला अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये घेऊन आले. स्पाईन सर्जरी व पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टरांच्या टीमने त्या मुलीची तपासणी केली. अनेक टप्प्यांचा समावेश असलेली तपशीलवार उपचार योजना आखली गेली पण त्यासाठी नाक, कान, घसा तज्ञ, बालरोगतज्ञ, प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंट यांची मदत घेण्यात आली.  तपशीलवार विचारविनिमय व सल्लामसलतीनंतर अतिशय गुंतागुंतीची अनेक टप्प्यांचा समावेश असलेली सर्जरी करण्याची योजना केली गेली. 

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे स्पाईन सर्जन डॉ. अग्निवेश टिकू यांनी सांगितले, ही एक जन्मजात फायब्रोटिक प्रक्रिया आहे खूपच दुर्मिळ आहे आणि फक्त 0.4% नवजात बाळांना हा त्रास होतो. सर्वसामान्यतः हा त्रास एका बाजूला होतो, तीन चतुर्थांश केसेसमध्ये उजव्या बाजूला होतो आणि मुलींपेक्षा मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. आज आमची मुलगी स्वतःचे डोके सरळ ठेवू शकते आणि आता ती इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे झाली आहे याचा आम्हाला खूप आनंद असल्याचे मुलीचे वडील  निलेश तिवारी यांनी सांगितले.