लोकल प्रवाशांना आता ई-पास मिळणार

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा, यासाठी ऑफलाइन कोव्हिड लसीकरण पडताळणी प्रक्रिया आणि त्याआधारे रेल्वे पास वितरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता ऑनलाईन ई-पास सुविधादेखील महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ असे त्याचे नाव असून या पद्धतीमुळे नागरिकांना प्रवासासाठी अतिशय सुलभतेने ई-पास मिळवणे शक्य होणार आहे. त्यासाठी https://epassmsdma.mahait.org  ही लिंक शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचारी आणि नागरिकांना ई-पास देण्यासाठी वेब लिंक यापूर्वीच विकसित केली आहे. सदर वेब लिंकचा उपयोग करून आता सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांना देखील मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी ई-पास उपलब्ध होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नागरिकांसाठी वापरात असलेल्या वेब लिंकमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवासाचा पास देण्याकरिता अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे. https://epassmsdma.mahait.org  ह्या लिंक चा उपयोग करून मुंबईकरांना आता  युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास मिळू शकतील. सदर लिंक सर्व वेब ब्राऊजरवर उपलब्ध असेल. हा ई-पास मोबाईलमध्ये जतन करुन, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडकीवर सादर केल्यानंतर नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून थेट मासिक प्रवास पास उपलब्ध होईल. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पुन्हा ऑफलाईन पडताळणीची आवश्यकता राहणार नाही. या ई पास सुविधेनुसार, ज्या नागरिकांचे कोव्हिड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत आणि दुसरा डोस घेवून किमान 14 दिवस पूर्ण झाले आहेत, ते नागरिक या ई पास साठी पात्र असतील. जे पात्र नागरिक पाससाठी अर्ज करतील, त्यांचे कोव्हिड लसीकरण पूर्ण झाल्याची (दुसरा डोस घेवून 14 दिवस पूर्ण झाल्याची) पडताळणी या लिंकवर आपोआप होईल. त्यासाठी वेगळ्या मानवी कार्यवाहीची आवश्यकता राहणार नाही. विशेष म्हणजे दुसरा डोस घेवून 14 दिवस पूर्ण न झालेल्या नागरिकांनी अर्ज केला तर त्यांना 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ई-पास उपलब्ध होईल.