Breaking News
संगीत विश्वातील एकूण 5 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांच्या नावी नोंदले गेले आहे असे विदर्भपुत्र कलाकार विराग मधुमालती यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ग्लोबल नागपूर अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नागपूर फर्स्ट फाउंडेशन द्वारा आयोजित सदर कार्यक्रम हा विविध कार्यक्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केला होता.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले कलाकार विराग मधुमालती यांनी आजपर्यंत तब्बल 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केले असून अन्य अनोख्या प्रबोधनपर मोहीमा राबविल्या आहेत. नेत्रदानाचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी तब्बल 100 दिवस डोळ्यांना पट्टी बांधत नेत्रदान विषयी जनजागृती केली होती. विराग यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अवयवदानाच्या प्रबोधनासाठी अर्पित केले आहे असे ते नेहमी सांगतात. ग्लोबल नागपूर अवार्ड मध्ये भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एकूण 17 विविध कार्यक्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार केला आणि विराग मधुमालती हे त्यांपैकी एक होते. सदर कार्यक्रमावेळी यावेळी राज्यसभा सभासद अजय संचेती, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त श्रीमती. प्राजक्ता वर्मा, श्रीमती देशपांडे (सह-संस्थापक , प्रेसिटेन्ट सिस्टीम), निधी पुंधीर (संचालिका- एचसीएल) व नागपूर फर्स्ट फाउंडेशन चे हकिमुद्दिन अली, दिनेश जैन, अमित वायकर, सचिन जहागीरदार,अनिकेत झा, हेमंत लोढा, फैज वाहिद, तन्वीर मिर्झा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
अवयवदानाचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे या एकचं उद्देश मनात ठेवत आगामी काळात विराग आपल्या छातीवर 60 किलो वजन चढवून पाण्याखाली जात, पाण्यात गाणे गाताना छातीवरील वजनासहीत ताल व सुर अनुसार श्वासाचा समतोल राखत, पाण्यामध्ये मुक्त वावर असलेल्या माश्यांमुळे विचलित न होता सुमधुर गीतांचा परफॉर्मन्स 1-2 मिनिटं नाही तर तब्बल एक तास सतत गाण्याचा आविष्कार सादर करण्यासाठी विराग सज्ज होत आहेत. तसेच विराग यांनी स्वतः निर्मित केलेल्या 17 लाख संगीत अलंकारांचे एकूण 2 लाख पानांचे आणि चक्क 40 फूट उंच जाडीचे म्हणजेच एकंदरीत 4 मजली इमारतीच्या उंचीचा संगीत का महासागर या नावाचा जगातील सर्वात उंच ग्रंथ निर्माण करत ते त्यांचा सहावा विश्वविक्रम करणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai