पुष्पकनगर वनजमीन हस्तांतरणास मंजूरी

नवी मुंबई ः पुष्पकनगरच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या 22.55 हेक्टर वन जमिनीच्या वापरात फेरफार करण्यासंदर्भात केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली असून या क्षेत्राच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. 26 जुलै 2018 रोजी वने व पर्यावरण मंत्रालयाच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी यासंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाला मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. 

सिडकोतर्फे वेगाने विकसित होत असलेले पुष्पकनगर 221 हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारले असून दर्जेदार अभियांत्रिकी व सामाजिक स्वरूपाच्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असेल. विकास आराखड्यानुसार या नगराच्या एकूण क्षेत्रफळातील 22.55 हेक्टर जमिन वन जमीन असून त्यावर पाणी पुरवठा, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक यंत्रणा, रस्त्यांची जोडणी या अत्यावश्यक आभियांत्रिकी सुविधा तर शाळा, समाज मंदीर, उद्याने व खेळाची मैदाने यांसारख्या आवश्यक सामाजिक सुविधांचा विकास केला जाणार आहे. परंतु विकास आराखड्यानुसार सदर विकासकामे वन जमिनीवर करायची असल्याने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी अत्यावश्यक होती. वरिल नमूद सुविधांअभावी पुष्पकनगरचा विकास अपूर्ण राहणार होता. यासाठी सदर वन जमिनीच्या वापरात फेरफार करण्यासंदर्भात सिडकोतर्फे राज्य शासन व केंद्र शासनात विविध टप्प्यांवर प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून सिडको महामंडळास सदर मंजूरीची प्रतिक्षा होती जी आज केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. पुष्पकनगर नवी मुंबई विकास आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या 14 नगरांपैकी एक असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या विकास व कार्यान्वयनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. पुष्पकनगर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण-पूर्व बाजूस असून रेल्वे व प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरशी जोडलेले आहे.