Breaking News
नुकतेच पंतप्रधानांनी संसदेत भाषण दिले. त्यात काँगेस आणि नेहरूंचा असंख्य वेळा उद्धार केला. 70 वर्षात देशाचा विकास झाला नाही तो आता आम्ही करू या आवेशात हे सरकार सत्तेत आलं. मात्र विकासाच्या सर्व मुद्द्यांवर सपशेल फेल ठरलेले हे सरकार स्वतः काय केलं हे बोलण्याऐवजी मागच्या सरकारला कोसण्यातच संपूर्ण ऊर्जा खर्च करत आहे. काँग्रेस नसती तरं आपल्या घोर अपयशाचे खापर कुणाच्या माथी फोडले असते? हा पण विचार त्यांनी केला पाहिजे.
परवा झालेले भाषण म्हणजे पंतप्रधानांनी संसदेत कसे बोलू नये याचा उत्तम नमुना होता. एखाद्या प्रचार सभेप्रमाणे त्यांनी आपण काय केले हे न सांगता फक्त काँग्रेसच्या नावाने खडे फोडण्याचे काम केले. अगर काँग्रेस ना होती तो काश्मिरी पंडितो को कश्मीर छोडने की नौबत ना आती, अहो, काँग्रेस नसती तर आज जम्मू-काश्मीर भारतातच नसते हे तुम्ही विसरलात काय? आज जो काश्मीर भारतात आहे तोसुद्धा पंडित नेहरूंमुळे हेसुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीर मध्ये जनमत घेतले गेले नव्हते. काश्मीर स्वतंत्र्य राष्ट्र होते. काश्मीरप्रश्नावर सरदार पटेलांना नेहरू आणि माउंट बॅटन यांना पत्र लिहिले. ‘सिलेक्टेड वर्कस ऑफ सरदार पटेल’ यात हे दोन्ही पत्र दिलेले आहेत. ह्या पत्रात पटेल लिहितात की, भारताने काश्मीरच्या भानगडीत पडू नये. कारण आपण तिथे जनमत घेतलेले नाही. त्यावर नेहरू असे म्हणाले की, काश्मीर भारतात असायलाच हवा कारण ती माझी (नेहरूंची)जन्मभूमी आहे. आणि म्हणून काश्मीरमध्ये हस्तक्षेप करणे भारताला भाग पडले. तेथील बहुसंख्य लोक आणि त्यांचा सर्वात मोठा लोकमान्य नेता शेख अब्दुल्ला यांची अशी मागणी होती की आम्हाला भारतातच राहायचे आहे. ज्यावेळी पाकिस्तानने आक्रमण केलं, त्यांचे सैन्य ज्यावेळी श्रीनगरपर्यंत पोचले त्यावेळी काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी भारत सरकारकडे, पंतप्रधानांकडे आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडे मदतीची मागणी केली आणि मग या अटीवर की भारतात सामील व्हावं लागेल असा करार लिहून दिल्यानंतर भारतीय लष्कराने कारवाई केली आणि काश्मीर भारतात आला. संसदेत एका प्रश्नाला उत्तर देतांना खुद्द मोदी सरकारनेच हे उत्तर दिलंय की कलम 370 हटविल्यापासून केवळ 2 लोकांनी जम्मू-काश्मिरात जागा विकत घेतली आहे. आता काँग्रेसमुळे जर कश्मिरी पंडित कश्मीर सोडून गेलेत तर 2014 पासून 7-8 वर्षात तुमचं सरकार असून किती कश्मिरी पंडित काश्मिरात परत राहायला गेलेत?ते पण सांगा कि...
काँग्रेस ना होती तो शिखो का संहार ना होता. अहो, तुमच्यामुळे पंजाब-हरियाणाचे 700 पेक्षा अधिक शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेत त्याबद्दल दोन शब्दाने तर श्रद्धांजली अर्पण करा. त्यात बहुतांश शीख होते. 700 लोक मारणे हा त्याहून मोठा नरसंहार आहे. आज पंजाबात काँग्रेसचेच सरकार आहे हे विसरलात का? आपल्याला रॅलीत गर्दी नाही म्हणून रॅली सोडून परत जावं लागलं, वरून जीवाला धोका आहे असे म्हणून खापर पंजाबच्या शेतकर्यांवर फोडावं लागलं त्याच पंजाबचा आणि शिखांचा आज इतका कळवळा येतोय?
अगर काँग्रेस ना होती तो देश विदेशी चष्मे की बजाय स्वदेशी संकल्पो के रास्ते पे चलता. हा कहरच झाला म्हणायचा. 2014 पासून सगळे मोठं-मोठे कॉन्ट्रॅक्ट चीनला देणारे पंतप्रधान स्वदेशीचा जयघोष करीत आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार पटेलांच्या पुतळ्याचा 3000 कोटींचा ठेका चिनी कंपनीला नेणारे हे सरकार, ‘बँक ऑफ चायना’ ला आपल्या देशात मान्यता देणारे हे सरकार, नुकताच तेलंगणाच्या शामशाबाद येथे लावण्यात आलेला रामानुजाचार्यांचा सोन्याचा पुतळा बनविण्याचे 400 कोटींचे कंत्राट चीनला देणारे हे सरकार स्वदेशीचा आग्रह धरते तेव्हा रडावं की हसावं कळत नाही. एल. आय. सी मधील विदेशी कंपन्यांचा हिस्सा 49% वरून 74% करण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चे कंत्राट सुद्धा ह्या सरकरने चिनी कंपनीलाच दिले होते. चीनचा निषेध म्हणून चीन च्या कंपन्यांना दिलेले सर्वच ठेके रद्द करायला पाहिजे होते. परंतु तितकीसुद्धा हिम्मत या सरकारने दाखविली नाही कारण पी. एम. केअर्स मध्ये अनेक चिनी कंपन्यांकडून यांनी करोडोंच्या देणग्या स्वीकारल्या आहेत. गुजरात मध्ये सर्वाधिक चिनी गुंतवणूक झालेली आहे आणि हे आपल्याला स्वदेशी चे फायदे समजावून सांगत आहेत.
अगर काँग्रेस ना होती तो बेटीयो को तंदूर में जलाया ना जाता... हाथरस ची घटना विसरले वाटत देशाचे पंतप्रधान. पीडितेच्या घरच्यांना घरात कोंडून रात्री अडीच वाजता त्या बिचारीचं शव पोलिसांकडून जाळून टाकण्यात आलं. पीडितेच्या कुटुंबियांना सरकारी अधिकार्यांकडून उघड धमक्या देण्यात आल्या. उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेला आणि तिच्या कुटुंबियावरच गुन्हे दाखल केले गेले होते. पीडितेच्या वडिलांना कारागृहातच मारून टाकण्यात आलं. त्यानंतर पीडितेचा अपघात करण्यात आला त्यात तिची काकू, मावशी आणि ड्रायव्हर जागेवरच मरण पावले. इतकं सगळं होत असतांना या प्रकरणातील आरोपी व भाजपचे आमदार कुलदीपसिंग सेंगरच्या पाठीमागे उत्तर प्रदेश सरकार भक्कमपणे उभं होतं. कठुवामध्ये 10 जानेवारी 2018 ला 8 वर्षीय आसिफाच अपहरण झालं आणि 17 जानेवारीला तीचं शव पोलिसांना सापडलं. तीन महिन्यांनंतर 11 एप्रिलला हे प्रकरण देशभर माहीत झालं कारण 10 एप्रिलला पोलीस या केस मधील आठही आरोपींविरोधात कोर्टात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यासाठी कोर्टात आले असताना स्थानिक बार असोसिएशनचे अध्यक्ष व सदस्यांनी व सत्ताधारी आमदार-मंत्र्यांसह तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरून भारतमाता की जय म्हणत बलात्कार्यांना पाठिंबा जाहीर केला. हे का विसरता मोदीजी? क्रमशः
-चंद्रकांत झटाले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai