Breaking News
देशात निर्वासित काश्मिरी पंडित यांच्या जीवनावर आधारित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल तर दिग्दर्शन विवेक अग्नीहोत्री यांनी केले आहे. काश्मीरमध्ये राहणार्या काश्मिरी पंडितांचे निर्घृण पद्धतीने शिरकाण केले, धर्मांतर केले आणि ज्यांनी त्यास विरोध केला त्यांना उर्वरित आयुष्य देशाच्या कानाकोपर्यात निर्वासितपणे जगण्यास भाग पाडण्यात आले याचे सादरीकरण करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला देशात अतिशय चांगला प्रतिसाद भारतीयांकडून मिळत आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या मनात दुसर्या समाजाबद्दल चीड आणि द्वेष निर्माण करण्यास हा चित्रपट यशस्वी ठरला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. खरंच इतिहासाची पाने उलगडत असताना आपल्याकडून त्याचा चुकीचा संदर्भ तर दिला जात नाही ना आणि त्याचा विपरीत परिणाम सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास होत नाही ना याचे भान निर्मात्याबरोबर अशा पद्धतीच्या चित्रपटांना परवानगी देणार्या सेन्सर बोर्डानेही ही ठेवणे गरजेचे आहे. परंतु देशात सध्या देशभक्तीच्या नावाखाली सर्वच यंत्रणांनी कमरेचे सोडून डोक्याला बांधलेले असल्याने त्यांच्याकडून याबाबत अपेक्षा ठेवणे एक दिवास्वप्नच आहे, परंतु त्याची किंमत भविष्यात देशाला द्यावी लागेल हे निश्चित.
ज्या लोकांकडे आणि राजकीय पक्षांकडे स्वतःचा इतिहास नसतो ते सदैव इतरांच्या इतिहासात डोकावत राहतात. भाजपाकडे स्वतःचे सांगण्यासारखे काही नसल्याने दुसर्याच्या इतिहासात लुडबूड करून चुकीच्या पद्धतीने लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून या देशात होत आहे. सध्या देशात अतिशय बेरोजगारी, महागाई, कडेलोटवर असलेली अर्थव्यवस्था आणि मरणासन्न आरोग्य व्यवस्थे सारखे भीषण प्रश्न आ वासून उभे असताना त्यावर वेळीच उत्तर शोधण्यास भाजपला अपयश आले आहे. नुकत्याच झालेल्या चार राज्यांतील निवडणुकात भाजपाला जरी यश मिळाले असले तरी हिंदू-मुस्लिम कार्ड चाललेले नसल्याचे त्यांना उमगले आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्स या विषयात पदवी संपादन केलेल्या मोदींना आता लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी इतिहासासारखा दुसरा विषय नाही याचे भान आहे. त्यांनी भारतीय जनतेला भूतकाळ आणि भविष्यकाळात असे काही गुंतून ठेवले आहे की लोक वर्तमान काळातील भेडसावणार्या समस्या विसरून भूतकाळाच्या इतिहासातच रमण्यात धन्यता मानू लागले आहेत.
भाजपच्या या धोरणामुळे घडून गेलेल्या घटना किती उगाळाव्यात आणि एकमेकांप्रती मने किती कलुषित करावी याचा निर्णय आता जनतेलाच घ्यावा लागेल. भूतकाळात झालेल्या चुका टाळण्यासाठी इतिहासाचा अभ्यास होणे गरजेचे आहे. परंतु सध्या इतिहासालाच अंतिम सत्य मानून एका विशिष्ट धर्माला लक्ष करून ज्या पद्धतीने तो भारतीयांच्या समोर आणून समाज विरोधात उचकवण्यात येत आहेत ते अतिशय घातक आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या रुपाने हाच प्रकार नव्या पद्धतीने भारतीयांसमोर आला एवढेच. या चित्रपटात सांगितलेले सत्य जरी विदारक सत्य असले तरी ते अर्धवट असल्याने समाजाच्या हिताचे नाही. बत्तीस वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांवरील खपल्या आज काढण्यात काय शहाणपणा किंवा अशा चित्रपट निर्मितीतून काय साधले जाणार आहे हे प्रश्न अनुत्तरित राहतात. अनुपम खेर हे स्वतः विस्थापित काश्मिरी पंडित असले तरी त्यांनी गेल्या सात वर्षात मोदी सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी काय प्रयत्न केले आणि किती काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये पुनर्स्थापित केले हे जनतेसमोर मांडले पाहिजे. हा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात दाखविण्यात आलेल्या आक्षेपार्ह्य घटनांबद्दल अनेक काश्मीर पंडितांनी आक्षेप नोंदवले आहेत. कोणतीही कलाकृती हि संदेश देणारी आणि समाजाला मनन करायला लावणारी असायला हवी. त्याऐवजी कोणतीही कलाकृती हि जर सामाजिक सद्भावना दूषित करणारी असेल तर ती कलाकृती न राहता तो अजेन्डा ठरतो आणि अशा अजेंड्याला बळी न पडणे हे प्रज्ञावंतांचे कर्तव्य आहे. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर जी भावना बहुसंख्य समाजात निर्माण झाली ती चिंतनीय तर आहेच पण अशा चित्रपटांची भलामण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जेव्हा खुद्द पंतप्रधान करतात तेव्हा देश अराजकतेच्या उंबरठ्यावर नक्कीच उभा आहे हे सांगण्यास कोणाही जोतिषाची गरज नाही.
‘द काश्मीर फाइल्स’ हा अर्धसत्य दाखवणारा चित्रपट आहे. ज्यावेळी काश्मीर पंडितांवर अत्याचार करण्यात आले त्यावेळी देशात पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांचे सरकार होते आणि त्या सरकारास भाजपचा पाठिंबा होता. त्यावेळी काश्मीरमधील सईद त्यांचे सरकार बरखास्त करून भाजपाच्या जगमोहन यांना गव्हर्नर म्हणून पाठवण्यात आले. हे सर्व महाभारत घडले ते गवर्नर जगमोहन यांच्याच कार्यकाळात. त्यामुळे हा अपराध त्यावेळच्या राजकर्त्यांचा होता आणि आता तो चुकीच्या पद्धतीने काँग्रेसच्या माथी मारण्यात येत आहे. ज्यावेळी अटलजींचे सरकार होते त्यावेळी हेच सईद देशाचे गृहमंत्री होते आणि त्यांच्याच मुलीला वाचवण्यासाठी अतिरेक्यांना सोडले. त्यांनी देशात बॉम्बस्फोट केले. त्यामुळे तत्कालीन सरकारचा नाकर्तेपणा जनतेच्या समोर आणण्याऐवजी विशिष्ट समाजाला लक्ष केले जात आहे, हे धोक्याचे आहे. त्यावेळीही हजारो मुसलमानांनी काश्मीर पंडितांना मदत केली हे कुठेही दाखवण्यात आले नाही. ज्याच्या काळात हे नृशंस हत्याकांड घडले त्याच्या मुलीसोबत भाजपने काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली. त्यामुळे हा चित्रपट हिंदूचे ध्रुवीकरण करण्यासाठी निर्मित केल्याचे जाणवते. 2019 साली ‘उरी’ या चित्रपटाद्वारे अशीच राष्ट्रभक्तीची लाट तयार करून मोदींनी दुसर्यांदा सत्ता हस्तगत केली. त्यामुळे हा चित्रपटही भाजपाची 2024 ची तयारी असू शकेल पण इतिहासाची पाने उलगडताना योग्य काळजी न घेतल्यास त्याचे परिणाम भावी पिढीला मात्र भोगावे लागतील हे निश्चित...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे