सिडकोच्या परवडणार्या घरांमध्ये पाण्याची परवड
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 31, 2022
- 711
गृहनिर्माण प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट ; नागरिकांची नाराजी
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. सिडकोचे अनेक गृहप्रकल्प शहरात उभे राहत आहेत. काहीपुर्ण झाले असून त्यांचा ताबाही लाभार्थ्यांना दिला आहे. मात्र या परवडणार्या घरात पाण्याची परवड होत आहे. मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्याच गृहप्रकल्पांत पाणीटंचाई असून हाती घेतलेल्या गृहसंकुलांना भविष्यात पाणी कुठुन देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एक लाख घरे बांधण्याचा संकल्प प्राधिकरणाने केला आहे. रेल्वे स्थानकासमोरील जागांवर इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर ट्रक व बस टर्मिनल्स आणि मोकळ्या जागेवर गृहसंकुले उभारण्यात येत आहेत. त्यांना भविष्यात सिडको पाणी देणार कुठून, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या तयार असलेल्या गृहसंकुलामध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. रोडपाली खारघर आणि तळोज्यात तर गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई असून स्थानिकांनी अनेकदा निवेदन दिली आहेत शिवाय मोर्चा, आंदोलनेही केली आहेत. मात्र अद्याप ही पाणीसमस्या सुटलेली नाही. असे असताना एमएमआरडीकडून मान्यता मिळालेल्या गृहसंकुलांना पाणी द्यायचे कुठून आणि कोणी हा प्रश्न अनुत्तरीत आहे. गृहप्रकल्प उभारतानाच तेथील सुविधांचे योग्य नियोजन न केल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागत असल्याची खंत रहिवाशी व्यक्त करत आहेत.
सिडकोबरोबरच इतर अनेक खाजगी गृहप्रकल्पही उभे राहत आहेत. लोकवस्ती वाढणार असून पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर आहे. नवी मुंबई महापालिकेचे स्वतःचे धरण असले तरीही अनेक नोडमध्ये पाणी टंचाई आहे. भविष्यात वाढती लोकसंख्या पाहता पाण्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच नवीन स्त्रोत कसे निर्माण होतील यासाठी चाचपणी करणे सोयीचे होईल. सध्या सिडकोनिर्मित खारघर, तळोजा, नवीन पनवेल येथील गृहसंकुलातील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत. सहा महिन्यांपासून तळोजातील सिडकोच्या गृहप्रकल्पात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र ते पाणी अस्वच्छ असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे आहे. सिडको, महापालिकेने वाढती लोकसंख्या लक्षात घेउन पाण्याचे स्रोत वाढविण्यावर, नवीन जलकुंभ उभारण्यावर तसेच धरणाची पाणीपातळी वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
- भविष्यात पाणी कुठून मिळणार
पनवेल तालुक्यात महापालिका क्षेत्राबाहेर एमएमआरडीएकडून मान्यता आणि परवानगी मिळालेले अनेक गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. या टोलेजंग इमारतीमध्ये हजारो घरांची निर्मिती केली जात आहे. त्याचबरोबर खासगी गृहसंकुलेही उभी राहत आहेत. एकीकडे सिडको वसाहतींच्या तोंडचे पाणी पळाले असताना तालुक्यात नव्याने बांधण्यात येणार्या इमारतींना पाणी मिळणार कुठून, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. - सहा महिन्यांपासून पाणीटंचाई
तळोजातील केदार, मारवा, आसावरी, धनश्री या सिडकोच्या गृहसंकुलांमध्ये 1600 सदनिकांपैकी केवळ 375 कुटुंब राहण्यास आली आहेत. मात्र या कुटुंबांनीही पुरेसे पाणी मिळत नसल्याने घर मिळाले पण पाणी व इतर सुविधा कधी मिळणार असा प्रश्न रहिवाशी उपस्थित करत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून पाण्याचा हा प्रश्न जैसे थेच आहे. सिडकोने याकडे गांभिर्याने न पाहता नियोजनासाठी कार्यवाही न केल्याने परवडणार्या घरांत पाण्यासाठी नागरिकांची परवड होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. समस्या न सोडविल्यास नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai