विमानतळ क्षेत्रास सिडको एमडींची भेट फोटो

नवी मुंबई ः सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी 4 ऑगस्टला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रास भेट दिली. यावेळी मोहा खाडीच्या बांध क्षेत्राची त्यांनी पाहणी केली. केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान केंद्राच्या (सीडब्लूपीआरएस) शिफारसी विचारात घेऊन उलवे नदीच्या नवीन प्रवाहावर जेथे पूल बांधणे प्रस्तावित आहे त्या वहाळ परिसरासही त्यांनी भेट दिली. 

यावेळी लोकेश चंद्रा यांनी मुख्य अभियंता (नमुंआंवि) यांना एनएचएआयकडून बांधण्यात येत असलेल्या सर्व्हिस रोड पुलाची रुंदी वाढवण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याबाबतची सूचना दिली. या रुंदीकरणामुळे सिडको सर्व्हिस रोडवर बांधण्यात येणार्‍या पुलाचा मार्ग प्रशस्त होईल व उलवे नदीचा प्रवाह वळविण्याच्या कामीही हे रुंदीकरण सहाय्यभूत ठरेल. या वेळी व्यवस्थापकीय संचालकांनी ईएचव्हीटी आणि सीडब्लूपीआरएसच्या शिफारसींनुसार करण्यात येणार्‍या कामांसाठी आवश्यक असलेल्या वन व पर्यावरण मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचे पुनर्विलोकन केले. तसेच विमानतळ क्षेत्रातील शिल्लक कामांचाही त्यांनी या वेळी आढावा घेतला. सिडको व्यवस्थापकीय संचालकांच्या या भेटीवेळी  आर. बी. धायटकर, मुख्य अभियंता (नमुंआंवि), पाटील, महाव्यवस्थापक (पर्यावरण), मूल व दाहेदार, वरिष्ठ अभियंते आणि गोसावी, विद्युत अभियंता हे उपस्थिती होते.