Breaking News
कर्नाटकतील भाजप सरकारने शालेय अभ्यासक्रमातून भगतसिंग यांच्यावरील धडा काढून आरएसएसचे संस्थापक हेडगेवारांच्या भाषणाचा समावेश केला आहे. भगतसिंग-पटेलांच्या नावाने गांधी-नेहरूंवर दिवसरात्र आरोप करणार्यांच्या लेखी क्रांतिकारकांची किती किमत आहे ते या कृतीने सिद्ध होते.
स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आरएसएस आणि भाजपच्या मनात कायम द्वेष भरलेला दिसतो. गांधी-नेहरूंनी भगतसिंगांसाठी काही केलं नाही असे म्हणत असतांना आरएसएसने त्यांची फाशी थांबविण्यासाठी काय केलं? हे मात्र सोयीस्करपणे सांगत नाहीत. गांधींनी सुभाषचंद्र बोस यांना दुखावलं सांगतांना हेडगेवारांनी दोन वेळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली हे ते सांगत नाहीत. गांधींनी सरदार पटेलांना डावललं सांगतांना पटेलांनीच आरएसएसवर बंदी आणली होती हे जाणीवपुर्वक लपवतात. मला अजिबात माफी नकोय तर आम्हाला युद्धकैदी म्हणून बंदुकीने उडवा म्हणणारे शहीद-ए-आझम भगतसिंग यांचा धडा पाठ्यपुस्तकातून काढून टाकला जातो. पण कायम ब्रिटिशांची चाकरी करणार्या, जे युवक स्वातंत्र्यलढ्यात येऊ इच्छितात त्यांना रोखणार्या हेडगेवारांचे भाषण मात्र पाठ्यपुस्तकात घेतले जाते हे संतापजनक आहे. स्वातंत्र्यलढ्याबद्दल जराही आस्था हेडगेवारांना नव्हती. असहकार चळवळीने तीव्र स्वरूप धारण केल्यावर संघाने स्वातंत्र्य चळवळीपासून अलिप्त राहू नये, असे त्यांतील तरुणांचे मत होते. पण त्याला हेगडेवारांनी कसे परावृत्त केले याचे वर्णन श्री.गुरुजी समग्र दर्शन, खंड-4,पृष्ठ 39-40, अनडुईंग इंडिया दी आरएसएस वे शमसुल इस्लाम या पुस्तकात आहे. अशा लोकांच्या विचारांना अभ्यासक्रमात स्थान देऊन सरकारला पुन्हा गुलामांची फळी निर्माण करायची आहे काय?
नेताजी बोस यांनीही हेडगेवारांच्या भेटीसाठी प्रयत्न केले परंतु ब्रिटिशांची खप्पामर्जी होईल म्हणून त्यांनी आजारी असल्याचे सोंग घेऊन सुभाषबाबूंची भेट टाळली हे हातिवलेकर व ना.ह.उर्फ नानाजी पालकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी स्पष्टपणे लिहीले आहे. आज त्यांचेच अनुयायी देशभक्ती कशी करावी याचे धडे देशवासियांना देताना दिसतात.
भगतसिंगांसाठी गांधींनी काय केलं अस विचारणार्यांना खरेतर भगतसिंगांबद्दल काहीच सोयरसुतक नाही. भगतसिंग हे कम्युनिस्ट विचारधारेचे म्हणजेच हिंदू महासभा व आरएसएसच्या एकदम विरुद्ध विचारसरणीचे. त्यातही ते नास्तिक. गांधींनी भगतसिंगांची फाशी टळावी म्हणून व्हॉईसरॉय आयर्विन यांच्यासोबत पूर्ण ताकदीनिशी चर्चा तर केलीच सोबतच आयर्विन यांना 5 पत्रेसुद्धा लिहिलीत. ती गांधी वाङ्ममयात उपलब्ध आहेत. प्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक जतींद्रनाथ सन्याल हे स्वतः भगतसिंगांचे सहकारी होते. त्यांनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देशाला झाली नाही याबद्दल आपल्या चरित्रात खंत व्यक्त केली आहे व गांधींनी केलेल्या प्रयत्नांची हकीकत सविस्तरपणे नोंदविली आहे. 1921 ते 1942 हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ‘अॅन इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकात लिहिला गेलाय. त्यात सुभाषचंद्र बोस म्हणतात, ‘इट मस्ट बी ऍडमिटेड दॅट गांधीजी डिड ट्राय हिज बेस्ट टू सेव्ह भगतसिंग’ अजून कुठला पुरावा हवाय? पण आरएसएसने मात्र फाशी थांबवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. एखादं आंदोलन केल्याचा किंवा साधा निषेध नोंदविल्याचा दाखला सुद्धा इतिहासात नाही. म्हणजेच या फाशीला मूक संमती असलेल्या संघटनेचे विचार अभ्यासक्रमात घुसवायचे व देशासाठी आहूती देणार्या क्रांतिवीरांचा धडा काढून टाकायचा ही विकृती नाही तर दुसरे काय आहे?
हिंदू धर्माच्या प्राचीन आणि उज्वल परंपरांचे गोडवे गाऊन लाखो युवकांना संघशाखांत आणण्यात आले. एक शिस्तप्रिय संघटना उभी करण्यात गोळवलकर यशस्वी झाले. पण लाखो तरुणांतून स्वातंत्र्यलढ्यात झोकून देण्याची प्रेरणा एकाही तरूणाला ते देऊ शकले नाहीत हे या संघटनेचे मोठे अपयश आहे. इतकेच नाही तर हेच संघी 1942 च्या आंदोलनातून दूर राहून ब्रिटिशांना सैन्यभरती व युद्ध प्रयत्नांना मदत करत होते. अमृतसर मधील जालियनवाला बागेचे ह्या केंद्र सरकारने आधुनिकीकरणाच्या नावाखाली पूर्णपणे रूप बदलून टाकले आहे. गुजरातमधील साबरमती आणि महाराष्ट्रातील सेवाग्राम हे दोन्ही गांधींचे आश्रम तोडून त्याजागी लोकांच्या मनोरंजनासाठी थीम पार्क बनविण्याचा घाट घातला आहे. गुजरात मधील सरदार पटेलांच्या नावाने असलेल्या स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी केले. देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या पटेलांचा इतका अपमान इंग्रजांनी सुद्धा केला नव्हता. याला कारण आहे ते म्हणजे पटेल यांनी आरएसएसवर लादलेली बंदी. ही बंदी उठवतांना गृहमंत्री पटेल यांनी ‘संघाने आपल्या कृतीतून भारतीय राज्यघटना व राष्ट्रध्वजाशी बांधिलकी निःसंशयरित्या दाखवून त्यांचा अपमान करु नये’ अशी अट घातली होती. त्यामुळे इंग्रजांसोबत असणार्या व क्रांतिवीरांच्या विरोधात कारवाया करणार्या हेडगेवारांचे विचार नवीन पिढीला शिकवून हे सरकार काय साध्य करणार आहे?
मोदी सरकारने गेल्या 8 वर्षात देशातील वातावरण पुर्णतः द्वेषाने व्यापून टाकले आहे. देशाच्या क्रांतीमय इतिहासाचं पर्व पुसून धार्मिक इतिहास लोकांच्या मनावर बिंबवला जात आहे. कर्नाटकात घडलेली ही घटना सूचक असून याला वेळीच आवरले नाही तर देशातील तरूणपिढीला स्फूरित करणारा, चेतना देणारा तेजोमय इतिहास लोप पावेल. ज्या देशाचा इतिहास नष्ट होतो त्याचा भुगोलही बदलतो असे म्हणतात. त्यादिशेने भारताचा प्रवास सुरु झाला आहे असे म्हटंल्यास वावगे ठरु नये.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai