धोरणात्मक निर्णयाचा अधिकार प्रशासकाला नाही - आ .गणेश नाईक
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 03, 2022
- 1029
उड्डाणपुल मंजुरीच्या चौकशीची मागणी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी महात्मा फुले जंक्शन ते कोपरी जंक्शनपर्यंत उड्डाणपुल बांधण्याच्या कामाला दिलेली प्रशासकीय मंजुरी वादात सापडण्याची शक्यता आहे. आमदार गणेश नाईक यांनी प्रशासकाला धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे सांगत याबाबत प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे तक्रार करुन संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले. नाईकांच्या या भुमिकेमुळे पुलाचे काम बाजुला राहुन प्रशासक बांगर यांचीच चौकशी लागते की काय? याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी सेक्टर 17 येथील महात्मा फुले जंक्शन ते कोपरी जंक्शनपर्यंत उड्डाणपुल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. 339 कोटी रुपयांच्या या कामाला आयुक्त तथा प्रशासक म्हणून अभिजीत बांगर यांनी जानेवारी 2021 मध्ये प्रशासकीय मंजुरी दिली आहे. आ. गणेश नाईक यांनी या प्रशासकीय मंजुरीलाच आक्षेप घेतला असून प्रशासकाला धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यघटनेने महापालिकेच्या नियोजनबद्ध कारभारासाठी शासन आणि प्रशासन या दोन चाकांची निर्मिती केली आहे. त्यामुळे या दोघांच्या समविचाराने कामकाज होणे अपेक्षित आहे. गेली दोन वर्ष कोरोना संक्रमणामुळे लोकप्रतिनिधींची नियुक्ती पालिकेवर होऊ शकली नाही. धोरणात्मक निर्णय घेणे हे लोकप्रतिनिधींचे काम असून त्याची अमंलबजावणी करणे हे प्रशासनाचे काम आहे असे नाईक यांनी सांंगितले.
कोरोना आपत्तीच्या काळात जनहितार्थ अनेक धोरणात्मक निर्णय पालिका प्रशासकाला घ्यावे लागले त्यावेळी आम्ही सहकार्यच केले. परंतु, बांगर यांच्या काळात सत्ताधार्यांच्या दबावाखाली पालिका प्रशासनामार्फत नवी मुंबईत करोडो रुपयांची अनावश्यक कामे काढली जात असल्याने प्रशासक नेमण्याच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निर्णयाद्वारे प्रशासकाची भुमिका कशी असावी हे अधोरेखित केलेली आहे. 351 कोटींचा उड्डाणपुल बांधणे हे सध्या अनावश्यक काम असून सत्ताधार्यांना निवडणुक फंड जमा करुन देण्यासाठी प्रशासक काम करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या मुद्दावरुन सुरु झालेली ही लढाई आता प्रशासकाच्या अधिकारापर्यंत पोहचली आहे. दरम्यान, नाईक यांनी याबाबत नगरविकास प्रधानसचिव यांच्याकडे प्रशासक तथा आयुक्त यांच्या या कारभाराची तक्रार करुन चौकशीची मागणी करणार असल्याचे ‘आजची नवी मुंबई’शी बोलताना सांगितले. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम बाजुला राहुन प्रशासकाच्याच मागे चौकशीचा ससेमिरा लागतो काय? अशी चर्चा पालिकेत सुरु झाली आहे.
- झाडे तोडू देणार नाही
अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल पर्यंतच्या उड्डाणपुलासाठी 390 झाडांचा बळी जाणार आहे. या बैठकीत आ. नाईक यांनी ही झाडे तोडू देणार नाही असे स्पष्ट केले. तसेच या उड्डाणपुलाच्या कामाला पालिका आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रशासक म्हणून आयुक्तांना हा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
- पर्यावरण दिनी लाँग मार्च
आमदार नाईक यांनी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी नवी मुंबई भाजपाच्या वतीने जन आंदोलनाचा लाँग मार्च लोकशाही मार्गाने, शांततेत काढण्यात येणार असल्याचे सांगितले. सकाळी दहा वाजता ऐरोली येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून हा लाँग मार्च मार्गस्थ होणार आहे. शहरातल्या विविध भागांमधून फिरून या लाँग मार्चची सांगता कोपरी येथे होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai