Breaking News
देशात भाजपाने सुरू केलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या विषारी राजकारणाने आता चरण सीमा गाठली आहे. हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तान या विषयांच्या प्रसार माध्यमांवर जाणीवपूर्वक सुरू असलेल्या चर्चांमुळे देशाची सामाजिक सौहदर्यता धोक्यात आली आहे. जाणीवपूर्वक विवादास्पद विधाने करून देशातील दोन मोठ्या समाजांमध्ये तणाव वाढवून मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. देशाच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या दृष्टीने भाजपचा हा प्रयोग अतिशय घातक असून तो आगीशी खेळण्याचा प्रकार आहे. या धोक्याबाबत विरोधी पक्ष व समाजातील विचारवंत सत्ताधारी पक्षाला वारंवार अवगत करत असतानाही सरकारकडून त्याला आळा घालण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. उलट पंतप्रधान अशा प्रसंगी मौन धारण करून भाजपच्या प्रवक्त्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत असल्याने त्यांच्या जीभा बेलगाम झाल्या आहेत. इतके दिवस त्याचा असर देशांतर्गतच बघायला मिळत होता परंतु आता त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. मागील काही दिवसात घडलेल्या या घटनांवरून भारताची प्रतिमा मलीन झाल्याचे दिसून येते.
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वादविवाद कार्यक्रमात मुसलमानांचे दैवत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते नविनकुमार जिंदल यांनी ही सोशल मीडियावर अशाच अर्थाचे विधान केले. या विधानाचे पडसाद आता जगभर उमटवायला सुरुवात झाली असून अनेक मुस्लीम देशांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपाने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना तक्ताळ प्रवक्ते पदावरून जरी हाकलले असले तरी त्यांच्यावर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यांचे विधान हे ‘फ्रीन्ज एलिमेंट’ कडून झालेले असून मोदी सरकार सर्व धर्मांचा सन्मान करत असल्याची सारवासारव सरकारकडून जरी करण्यात आली असली तरी आता खूप उशीर झाला आहे. सत्तावीस देशांच्या इस्लामिक को-ऑपरेशन संघटनेनेही पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा तीव्र निषेध करून संयुक्त राष्ट्राला भारतातील मुसलमानांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. कतारने सर्वप्रथम आवाज उठवून भारतीय राजदूताला बोलवून आपल्या भावना व्यक्त केल्या. वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी बेलगाम वक्तव्य करण्यास चटावलेल्या नुपूर व नवीन जिंदाल यांनाही एवढ्या तीव्र प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटतील याची कल्पना नव्हती.
सौदी अरेबिया, कतार, कुवेत, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, संयुक्त-अरब अमिरात, बहारीन, लिबिया, मालदीव या देशांनी भारतीय राजदूताकडे निषेद व्यक्त करून आपला संदेश दिला. अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारनेही कडक शब्दात निषेध नोंदवून अशा विधान करणार्या अराजक तत्त्वांविरुद्ध कारवाई करण्यास सुचवले आहे. सौदी-अरेबिया व कतारसह काही अरब देशांनी त्यांच्या सुपर मार्केट मधील भारतीय उत्पादनांवर बंदी घातली आहे. काही सुपरमार्केटनी तांदळाची पोती, मसाले, मिरचीचे शेल्फ प्लास्टिकच्या आवरणाने झाकून टाकून भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संदेश दिला. धर्मांधतेला बढावा दिल्यास त्याचे आंतराष्ट्रीय स्थरावर काय परिणाम होऊ शकतात याची प्रथम झलक मोदी सरकारला पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच भारतातील मुसलमानांच्या सुरक्षतेबद्दल काहूर माजवायला पाकिस्तानला संधी मिळाली असून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय मुसलमानांचे अधिकार हिरावून घेतले जात असल्याचा कांगावा त्याने सुरू केला आहे. याबाबत संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. ही संधी पाकिस्तानला भारताच्या चुकीच्या धोरणामुळे मिळाली असून त्याचे परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागतील हे निश्चित.
वसुदैवः कुटुंबंमः आणि सर्वधर्मसमभाव ही भारताची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. परंतु गेल्या आठ वर्षांच्या मोदी सरकारच्या कालखंडात सरकारच्या भूमिकेमुळे व त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वागणुकीमुळे हि ओळख पुसली जाऊ लागली आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म हा प्राणा एव्हढाच प्यारा असतो. हजारो वर्षापूर्वी मोगलांचे हल्ले आणि मंदिरांची तोडफोड करून बांधलेल्या मशिदी याचा वर्तमान काळाशी तसा काहीही संबंध नाही. त्या आधारे जर मुसलमानांचा द्वेष केला जाणार असेल तर तो नियम देशातील बौद्ध प्रार्थना स्थळे नष्ट करणार्या हिंदु राजानांही लागू होईल. भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाल्यानंतर या देशात जे मुसलमान राहिले ते आपले बांधव आहेत या भावनेने आपण वागणे गरजेचे आहे. या देशात पंधरा टक्के मुसलमान समाज आहे. या समाजाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गातुन बाहेर काढून भारत विकास आणि प्रगतीचा कधीही अवलंबू शकत नाही. ज्या देशात सदैव सामाजिक अशांतता राहते तो देश सदैव धुमसतो आणि अधोगतीच्या पंथावर जातो. प्रखर जातीयवाद आणि वर्णवादी यामुळे हा देश गुलामगिरीत गेला हे सत्य समोर असताना आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका का करत आहोत याचा उलगडा होत नाही. ज्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये धर्मांधतेचे बीज पेरले गेले त्या देशांची आजची परिस्थिती पाहिली तर जाणवते की शांतता हाच मानवतेच्या प्रगतीचा आणि उत्थानाचा खरा मार्ग आहे.
भाजपच्या नुपूरी प्रवक्त्यांच्या छमछममुळे आज भारत पहिल्यांदाच बॅकफूट वर आला आहे. भारताचे सुमारे दोन कोटींहून अधिक लोक अखाती देशात काम करून अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहेत. देशातील अनेक उद्योग आखाती देशांत माल पाठवून देशाचा विकास साधत आहेत. खनिज तेलाबाबत आत्मनिर्भर नसल्याने देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे आखाती देशांवर अवलंबून आहे. आपण चहुबाजूने मुसलमान राष्ट्रांनी घेरलो असतानाही दोन्ही युद्धात त्यांनी पाकिस्तानला कधीही पाठिंबा दिला नाही. त्यामुळे मोदी यांनी आपल्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा त्याग करून ‘सबका साथ सबका विकास’ हाच मार्ग स्वीकारायला हवा. आता घडलेली घटना छोटी जरी वाटत असली तरी वेळीच छमछम करणार्या भाजपच्या नुपूरी प्रवक्त्यांना वेळीच आवर घातला नाही तर देश गृहयुद्धाच्या खाईत जाईल हे निश्चित...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे