Breaking News
नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार बनवण्याची अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवली आहे. त्यानी मोठे बंड केले असून बत्तीस आमदारांसह दहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवून आपलाच गट हा खरा शिवसेना पक्ष असल्याचे सांगत सेनेच्या चिन्हावर दावा ठोकला आहे. अजूनपर्यंत हा दावा जरी निवडणूक आयोगाकडे केला नसला तरी त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रात वकूब किती याची जाणीव सर्व सेनेच्या आमदारांना असतानाही त्यांनी हे जाणीवपूर्वक पाऊल उचलले की त्यांना फसवून नेण्यात आले याचा उलगडा व्हायचा बाकी आहे. शिंदे यांनी सत्तांतराचा पुढे केलेला हिंदुत्वाचा मुद्दा हा गौण असून जर त्यांना आता बाजूला व्हायचे असेल तर सरकार स्थापनेलाच विरोध करायला हवा होता. परंतु त्यांनी तसे न करता अडीच वर्षांनंतर हे पाऊल उचलले याचाच अर्थ ‘बात तो कुछ और है दोस्तो’..
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्याची सत्ता हातातून गेल्याने भाजपा गेले अडीच वर्ष कासावीस आहे. येन-केन प्रकारे हे सरकार पाडण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून अनेकदा झाला. कुठल्यातरी अभिनेत्याच्या मृत्यूचे भांडवल करून किंवा अंबानीच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला घेरण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर कधी पेन ड्राईव्ह बॉम्बच्या माध्यमातून सरकारमधील बदल्यांचा भ्रष्टाचारवर भर देऊन बदनाम करण्याचा एकही प्रयत्न भाजपने सोडला नाही. एवढे करूनही सरकार पडत नाही हे दिसल्यावर महाविकास आघाडी नेते, मंत्र्यांमागे प्रवर्तन संचालनालयाचा ससेमिरा लावण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत, तर सेनेचे परिवहन मंत्री अनिल परब त्याच मार्गावर आहेत. गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, मुंबईचे माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव, संजय राऊतांचे भाऊ प्रवीण यांच्यावर इडी व सीबीआयने कारवाई करून आत टाकलेच आहे पण त्याचबरोबर त्यांची स्थावर मालमत्ता गोठवली आहे. निदान मेहुण्यासाठी तरी उद्धव नरमाईची भूमिका घेतील या अपेक्षेत असलेल्या फडणीसांचा भ्रमनिरास झाल्याने शेवटी त्यांनी सेनेच्या वजिरालाच लक्ष करून सरकारला शह देण्याचा शेवटचा प्रयत्न सुरू केला आहे. यात त्यांना किती यश मिळते यावर महाविकास आघाडीची दारोमदार आहे. शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिन जोशी, अजय आशर यांच्यावर गेले अनेक महिने इन्कम टॅक्स आणि इडीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले होते. याबाबतची जाणीव शिंदेना करून देऊन योग्य तो निर्णय घेण्यासाठी दबाव वाढवला होता. परंतु 15 दिवसांपूर्वी पुन्हा ईडीने समन्स बजावले आणि शिंदे यांना पुढचे राजकीय भवितव्य दिसू लागल्याने त्यांनी हा सारा प्रपंच केल्याचे बोलले जात आहे.
बंडखोरी ही शिवसेनेला नवीन नाही. शिवसेनेत सुरुवातीला छगन भुजबळ, त्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे व शेवटी राज ठाकरे यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला तर राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढून आपला वेगळा मार्ग चोखाळला. ज्यावेळी ही बंड झाली त्यावेळी स्वतः बाळासाहेब जिवंत होते आणि त्यांची सेनेवर मजबूत पकड होती. परंतु आता जी बंडाळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सेनेत झाली आहे त्याला ते कसे हाताळतात यात त्यांचा कस लागणार आहे. शिंदे यांची जरी ही बंडाळी असली तरी त्यामागे अतिशय सूत्रबद्ध रीतीने हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वीची सेनेतील बंडाळी ही फक्त त्या नेत्यापुरती आणि त्याच्या कार्यकर्त्यांपुरतीच मर्यादित होती. परंतु यावेळी मात्र शिंदे यांनी शिवसेना हा माझा पक्ष असल्याचा दावा ठोकला असून उद्धव ठाकरे यांना उपरा ठरवले आहे. शिंदे यांचा राजकीय वकूब आणि कायद्याचे ज्ञान पाहता हि बुद्धी त्यांची नाही हे नक्कीच आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांची जबाबदारी वाढली आहे. जे काम गेल्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात फडणवीस करू शकले नाहीत ते काम त्यांनी शिंदेंच्या माध्यमातून केले आहे.
देशात आम्ही सांगू तेच हिंदुत्व हा विचार मानणारा पक्ष इतर हिंदुत्ववादी पक्षास नेस्तनाभूत करेल. त्यामुळे शिंदेंच्या बंडामागे कोणत्या राष्ट्रीय पक्षाचा हात आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सरकार पाडण्याची ही शेवटची संधी असल्याने लागेल तेवढी शिबंदी भाजप शिदेंच्या मागे उभी करणार हे निश्चित. शिंदेंकडे पक्षात फुट पाडण्यास आवश्यक असणारे आमदारांचे पाठबळ नसल्याने त्यांनी शिवसेनाच हायजॅक करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी शिवसेनेचे खासदार, नगरसेवक व पदाधिकारी हे आपल्या पाठिशी असल्याचे पुरावे गोळा करत आहेत. शिंदे ज्या पद्धतीने पावले टाकत आहेत त्यावरून एक गोष्ट निश्चित आहेत की ते शिवसेनेला मुळासकट संपवण्यास निघाले आहेत. ही भुमिका घेण्याइतपत त्यांच्याकडे तेवढी बुद्धीमत्ता आणि हुषारीही नाही. आतापर्यंत ज्यांनी सेनेत बंडखोरी केली हे सर्व नेते शिंदेपेक्षा कितीतरी पटीने ताकदवान होते. परंतु कालांतराने ते बंडखोरही स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी इतर पक्षात गेले, हीच गत नंतर या बंडखोरांची होणार हे निश्चित. बंडखोरांना मोठे नेते मानून त्यांच्यासोबत गेलेले आमदार सध्या कुठे आहेत आणि बंडखोर नेते सध्या कुठल्या पक्षात आहेत याचाही विचार करणे शिवसैनिकांना गरजेचे आहे. त्यामुळे शिंदे करत असलेला दावा मोडून काढणे आता शिवसेना पदाधिकार्यांच्या हाती आहे. पाठबळ देत असलेल्या राष्ट्रीय पक्षाला हाताशी धरून एकनाथ शिंदे हे निवडणूक आयोगाकडून कदाचित स्वतःला हवा तसा आदेश मिळवू शकतील आणि शिवसेना हा माझाच पक्ष आहे असे जाहीर करुन उद्धव ठाकरे यांना उपरा ठरवतील. शिवसेना संपली असा अपप्रचार गोदी मीडियाच्या माध्यमातून करतील. निवडणूक आयोगाचा आदेश कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही हे दाखवून द्यायची जबाबदारी जरी विधीतज्ञांची असली तरी त्याला सत्याचे अधिष्ठान मिळण्यासाठी सेनेतील संपूर्ण पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे असल्याचा दावा करणे गरजेचे आहे. प्रसंग अतिशय बाका आहे कारण त्यावर उद्याच्या महाराष्ट्राचे आणि मुंबईचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणून सर्वानीच अतिशय गंभीरपणे याचा विचार करून निर्णय घेण्याची वेळ आहे कारण... बात तो कूच और है दोस्तो...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे