Breaking News
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना आपल्याला मुख्यमंत्रीपद गेल्याचे दुखः नसल्याचे सांगितले, पण ज्या कुर्हाडीने आपल्यावर आणि शिवसेनेवर वार केला त्या कुर्हाडीचा दांडा हा शिवसेना याच वृक्षाचा होता असे सांगितले. गेली अनेक वर्ष शिवसेना संपवण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झाला. पण ज्या पद्धतीने फडणवीस यांनी सेनेच्या मुळावरच घाव घातला आहे त्यावरून त्यांना शिवसेनेला नामोहरम करायचं नाही तर सेनेला पूर्ण मातीत गाडून आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद हिरावून घेणार्या उद्धव ठाकरे यांचे राजकीय जीवन संपुष्टात आणायचे आहे. राज्यातील सत्तांतर हि तर या ऑपरेशनची सुरुवात आहे अंतिम ध्येय मात्र वेगळे आहे. भविष्यात महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणायची असेल तर शिवसेना हा भाजपा समोरील सर्वात मोठा अडसर आहे. हिंदुत्व आणि कट्टरतावाद हा भाजपचा अजेंडा असून शिवसेना हि त्यांच्या हिंदुत्वाच्या विषयात वाटेकरू आहे. हजारो वर्षांपासून तमाम ‘बहुजनांना शेंडी’ लावणारे हिंदुत्व भाजपला हवे आहे. परंतु शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नको असे प्रबोधनकारांचे वारसा सांगणारे उद्धव ठाकरे म्हणत असून बहुजनांना प्रिय असलेल्या सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पुरस्कार त्यांनी केला आहे. बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेत राज्यातील 18 पगड जाती-जमातीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्र काबीज करायचा असेल तर शिवसेना संपवणे हे भाजप आणि कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कर्ता करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य उद्दिष्ट राहील हे निश्चित.
तळागाळात व करोडो मराठी माणसाच्या मनावर राज्य करणार्या शिवसेनेला संपविण्याची ताकद भाजपमध्ये नक्कीच नाही. दोन्हीवेळा स्वतंत्र लढूनही भाजपाला शिवसेनेच्या कुबड्या घेऊनच सत्ता स्थापन करावी लागली हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे शिवसेनेचा मतदार आपल्याकडे वळवायचा असेल तर शिवसेनेला संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि हे काम शिवसैनिकच करू शकतो याची जाणीव झाल्याने फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना बंडखोरी करण्यास भाग पडले. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून शिंदे यांनी बंडखोरी केली नसून त्यांना कशाच्या तरी भीतीने किंवा दडपणाखाली बंडखोरी करण्यास भाग पाडले हे नक्कीच. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची राजकीय परिपक्वता आणि वागणे पहिले कि जाणवते ते त्या पदाचे दावेदार कधीच नव्हते हे त्यांनाही ठाऊक आहे. पण त्यांना मुख्यमंत्री करणे हा वेगळ्याच रणनीतीचा भाग आहे. ‘बाटगा जास्त कडवट असतो’ त्या धर्तीवर सेनेतील बंडखोर हे सेना आणि ठाकरे यांना संपवण्यासाठी जिवाचे रान करतील या भावनेतूनच शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. शिंदे हे ज्यापद्धतीने सेनेवर एकामागून एक वार करत आहेत त्यावरून उद्धव ठाकरे यांना ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ या म्हणीचा प्रत्येय चांगलाच आला असेल.
उद्धव यांच्या बाजूने ठाकरे आडनाव आहे आणि शिवसैनिकांचे तीर्थक्षेत्र ‘मातोश्री’ निवासस्थान आहे. म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अधिष्ठान त्यांंच्यामागे भक्कम उभे आहे. परंतु आमचीच शिवसेना खरी, असे शिंदे सांगून जाणीवपूर्वक ते शिवसैनिकांत संभ्रम निर्माण करत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी ते दिल्लीत गेले तेव्हा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ‘आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेशी युती केली आहे असे सांगितले. थोडक्यात शिवसेना हायजॅक करायची याचा पूर्ण आराखडाच भाजपने तयार केला असून त्याची अंमलबजावणी ते शिंदेंमार्फत करत आहेत एवढेच. सेनेतील बंडाळीचा दुसरा अंक न्यायालयात आणि तिसरा जनतेच्या न्यायालयात होईल. महाराष्ट्राला या दोन्ही अंकांची प्रतीक्षा आहे.
शिंदे गटाला जाऊन मिळाले म्हणून आमदार संतोष बांगर यांची हकालपट्टी झाली ती हिंगोलीचे जिल्हाप्रमुख म्हणून. शिवसेनेच्या पक्षरचनेत पक्षप्रमुख, शिवसेना नेता, उपनेता, संपर्कप्रमुख या पदांनंतर पाचव्या क्रमांकाचे हे पद आहे. ‘मला जिल्हाप्रमुखपदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही.’ असे थेट आव्हानच त्यांनी ठाकरेंना दिले. शिंदेनिष्ठेचे शक्तिप्रदर्शन करणारे बांगर आपले वर्हाड घेऊन धडकले ते वर्षा बंगल्यावर. हिंगोलीच्या जिल्हाप्रमुखपदी बांगरच राहतील, अशी घोषणा शिंदे यांनी केली. पण सध्या सर्वच प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याचा फायदा घेऊन उद्धव ठाकरेंचे मानसिक खच्चीकरणाचा हा हेतुपुरस्पर डाव आहे. शिवसेना कुणाची याचा फैसला निवडणूक आयोगासमोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमनेसामने उभे ठाकतील तेव्हाच होईल. निवडणूक आयोगाच्या दप्तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना शिंदे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक करायची हे अनाकलनीय असून ते दिल्लीच्या खंबीर पाठिंब्या शिवाय शक्य नाही. आज जे सुरू आहे त्यात कडवट शिवसैनिक कुठे आहेत? असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. शिंदे गटाचे बंड आणि त्याविरुद्ध निकराने झुंजणारा पक्षप्रमुख ही तुंबळ लढाई हा कट्टर सैनिक आखाड्याबाहेर बसून पाहतो आहे, कारण उद्धव ठाकरेंच्या दरबारी राजकारणामुळे रस्त्यावरील सामान्य सैनिक राजकारणाबाहेर फेकला गेला.
या संकटात शिवसेनेला ठाकरेंना फक्त हा कट्टर शिवसैनिकच तारू शकतो. बांगर यांच्या शक्तिप्रदर्शनाची हवाच काढून घेणार्या हिंगोली जिल्ह्याने ही आशा जागवली. हिंगोलीतील 5 तालुका प्रमुखांपैकी 4 तालुकाप्रमुख ठाकरेंसोबत आणि केवळ एक तालुकाप्रमुख शिंदेंसोबत होते. बंडखोरांना धुळीस मिळवून नवे नेतृत्व नेहमीच शिवसैनिक उभे करत आला आहे. जिल्ह्याजिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेनेमागे, मातोश्रीसोबत असेच एकवटतील का? शिवसेना नावाचा ब्रँड ठाकरेंकडेच राहील याची आज शाश्वती नाही कारण निवडणूक आयोग काय निर्णय देईल आणि ठाकरेंना न्यायालयात किती वर्षे चक्करा मारायला लावील याचा काही नेम नाही. आज शिवसैनिकांना देण्यासारखे उद्धव यांच्याकडे काही नाही. मातोश्रीला संपवण्यासाठी भाजप शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांना कुर्हाडीचा दांडा म्हणून वापरत आहे. भाजप आणि शिंदेंच्या कुर्हाड नितीच्या राजनितीला झुगारून कट्टर शिवसैनिक भगव्याखाली पुन्हा मातोश्रीसोबत उभा ठाकला तर ते शिवसेनेला वरदानच ठरेल अन्यथा कुर्हाडीचा दांडा गोतास काळ आहेच...!
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे