अनेकातून एकतेचा राजमार्ग
- by संजयकुमार सुर्वे
- Jul 22, 2022
- 865
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात विविध धर्माचे, जाती-पंथाचे, विचारांचे, संस्कृतीचे व विविध रंग-ढंगाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे विविधतेतून एकता ही भारताची ओळख संपुर्ण जगात आहे. त्यात भारतीय जनता पक्षाने नाविन्यतेची भर टाकली आहे. भारतीय राजकारणात अनेक लक्षणांबरोबर अजून एक लक्षण विकसित झाले आहे. राजकारणाच्या आखाड्यात सातत्याने एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे कालांतराने एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सत्तेचा सोपान मिळवतात. एखादा राजकारणी गुंड, मवाली, दरोडेखोर आहे व त्याने राज्याला लुटून खाल्लं असा घसा फोडून आरोप करणारे शेवटी सत्तेसाठी त्याचीच गळाभेट घेतात हि राजकारणातील नवीन विविधतेतील एकता चमत्कारिक म्हणावी लागेल.
भाजपच्या किरीट सोमय्या यांनी संपूर्ण समाजाला स्वच्छ करण्याची मोहीम स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हाती घेतली आहे. भ्रष्टाचाराची त्यांना प्रचंड चीड आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणार्या लोकांना ते सतत गुंड, डाकू, मवाली व माफिया अश्या उपाधीने गौरवत असतात. शिवसेनेच्या लोकांसाठी त्यांनी ‘माफिया गँग’ हा शब्द पेटंट म्हणून घेऊन ठेवला आहे. महाविकास आघाडी बनल्यावर त्यांनी सर्वप्रथम प्रताप सरनाईक यांना टार्गेट केले. त्यांचे चिरंजीव विहंग यांच्याशी संबंधित विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्यांच्या नावाखाली एनएसीएल आणि पीएलएमए या कंपन्यांसोबत झालेले आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता यावर बोट ठेवत सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप केले. शिवसेना आणि त्यांच्या माफिया गँगने संपूर्ण महाराष्ट्राला लुटून खाल्ले असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या तक्रारीवरुन इडीने टाकलेल्या धाडीतून सरनाईक यांच्या घरी 11 कोटींचे घबाड सापडले. मग अशा लुटारू माफिया गँगसोबत सत्शिल भाजपने घरोबा कसा केला? हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. यापुढे सरनाईक यांची चौकशी सुरू राहील का? याचेही उत्तर भाजपाला द्यावे लागेल. असे आरोप फक्त सरनाईकांवरच नाही तर सेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावरही करण्यात आले. बंडखोरीनंतर गवळी यांनी कोणत्या मनस्थितीत सर्वांनी बंडखोरी केली हे उद्धव ठाकरे यांनी समजून घेतले पाहिजे असे त्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे गवळी यांच्या पत्रामागचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. गवळी यांच्या बालाजी पार्टिकल्स लिमिटेड या कंपनीने राष्ट्रीय सहकार महामंडळाकडून 29 कोटी आणि राज्य शासनाकडून 14 कोटी रुपयांचे कर्ज त्यांच्या कारखान्यासाठी घेतले. हा कारखाना कधी उभा झालाच नाही. उलट हा कारखाना सात कोटींना विकल्याचे गवळी यांच्याकडून ईडीला सांगण्यात आले. ज्या सोमय्यांनी भावना गवळी यांचा हा भ्रष्टाचार बाहेर काढला त्या व्यवहाराची चौकशी पुढे होणार काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मुंबईचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी आपल्याला कॅन्सर झाला असतानाही उद्धव ठाकरे भेटायला आले नाहीत म्हणून बंडखोरी केल्याचे सांगितले. खरंच हेच कारण आहे का या बंडखोरी मागे. तसे असेल तर गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मित निधन झाल्यावर त्यांच्या अंतयात्रेला मोदी आले नाही म्हणून पंकजा मुंडेनी बंड केले नाही. राष्ट्रवादीचे भारत भालखी यांच्याही अंतयात्रेला शरद पवार आले नाहीत म्हणून भगीरथ भालखी यांनी पक्ष न सोडता राष्ट्रवादीचे काम करत राहिले. विलासराव देशमुख यांच्या अंतयात्रेला सोनिया गांधी हजर राहिल्या नाहीत म्हणून देशमुख कुटुंबाने काँग्रेस पक्ष सोडला नाही. यशवंत जाधव यांच्या घरावर पडलेल्या धाडीत जे संपत्तीचे घबाड ईडीच्या हाती लागले त्याचा या बंडखोरीशी संबंध आहे हे न समजण्या इतपत महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही.
शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांचा उल्लेख भाजपच्या चित्रा वाघ यांनी इतिहास कालीन राजा पाटील असा केला. ज्या पद्धतीने महाराजांनी राजा पाटील याचा चौरंगा महाराजांनी केला त्याच पद्धतीची सजा महाविकास आघाडीने पाटील यांना द्यायला हवी होती अशी मागणी वाघ यांनी केली होती. आज हेच पाटील शिंदे गटात असून त्यांच्याबरोबर भाजपाने सत्ता बनवली आहे. मग अशा निर्लज्ज माणसाविरोधात चित्रा वाघ यांचे आंदोलन सुरूच राहील का? याचेही उत्तर भाजपने दिले पाहिजे. पूजा चव्हाण बलात्कार आणि मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना महाविकास आघाडीने पाठीशी घातले म्हणून कारवाई करण्यासाठी चित्राजींनी पदर खोचला होता. आता राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह ते उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे करतील का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. अब्दुल सत्तार यांनी राज्यात हिंदुत्व धोक्यात आले म्हणून बंडखोरी केल्याचे सांगितले. खरंच भाजपला एक जबरदस्त मुस्लिम नेता हिंदुत्व रक्षणासाठी सापडला असून त्याच्या हाताखाली एक आंतरराष्ट्रीय आंदोलन उभे करून संपूर्ण देशाबरोबर पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशातही हिंदुत्वाचा झेंडा फडकवण्याची नामी संधी भाजपला मिळाली आहे. त्यामुळे भारतीयांनी शेकडो वर्षांपासून पाहिलेले अखंड भारताचे स्वप्न आरएसएस व भाजप निश्चितच सत्तार यांच्या माध्यमातून पुर्ण करेल यात तीळमात्र शंका नाही.
ज्या लोकांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व भ्रष्टाचारी-माफिया आज भाजपात आल्यानंतर स्वच्छ झाले आहेत. ही स्वच्छता मोहिम फक्त महाराष्ट्रात राबविली नसून ती बंगाल, गुजरात, कर्नाटक मध्यप्रदेश व गोवा सारख्या राज्यातही राबविण्यात आली आहे. विरोधीपक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्यावर दबाव आणून त्या राज्यातील सरकार पाडायचे आणि या भ्रष्ट लोकांवर गोमूत्र शिंपडून शुद्ध करून स्वतःचे सरकार बनवायचा नवीन गोरख धंदा भाजपने देशात सुरू केला आहे. विरोधकांची माफिया, गुंड म्हणून हेटाळणी करणारे आज याच लोकांना आपल्या पक्षात घेऊन त्याचे नेतृत्व करत आहेत. आपल्या विचारधारेला अनुसरुन स्वतःचा पक्ष वाढवून कार्यकर्ते व पुढार्यांची फळी तयार करण्याऐवजी इतर अनेक पक्षातील भ्रष्ट पुढारी आपल्या पक्षात आणून सत्ता मिळवण्याचा ‘अनेकातून एकतेचा’ हा नवा पाठ भाजपने जगाला घालून दिला आहे. हे जरी खरे असले तरी ‘ये पब्लिक है सब जानती है’.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे