कोरोना काळात नोंदवलेले गुन्हे मागे घ्या
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2022
- 628
सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांची राज्य सरकारकडे मागणी
नवी मुंबई ः राज्य सरकारने गणेशोत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक उत्सवातील गुन्हे मागे घेण्याचे सूतोवाच केले आहे. यातील बहुतांश गुन्हे हे राजकीय कार्यकर्ते आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर नोंदवले गेलेले असतात. मात्र याच धर्तीवर कोरोना काळात नियमांचे उल्लंघन केले म्हणून ज्या सामान्य नागरिकांवर गुन्हे नोंद झालेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. उलटपक्षी जीवाची भीती असून देखील कुठल्यातरी अपरिहार्यतेमुळे संबंधित गुन्हे नोंदवल्या गेलेल्या व्यक्ती या घराबाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हे देखील गुन्हे सरसकटपणे मागे घ्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
कोरोना या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध घातलेले होते. सरकारने या कालावधीत देशात व राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केलेला होता. संचारबंदी लागू केलेली होती. कोरोना हि न भूतो न भविष्यते अशी परिस्थिती असल्यामुळे सरकारी यंत्रणांना नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आणणे अत्यंत जरुरीचे होते हि नाण्याची एक बाजू असली तरी दुसरी बाजू हि देखील होती की कुठलीही पूर्व सूचना न देता लागू केलेल्या कडक टाळेबंदी मुळे नागरीक अनेक ठिकाणी अडकून पडलेले होते. त्यामुळे त्यांना एनकेन प्रकारे स्थलांतर करणे अनिवार्यच होते, ती त्यांची हतबलताच होती. संपूर्णपणे बाहेरील मेस -हॉटेलवर अवलंबून असणार्या विद्यार्थ्यांना एक तर आपल्या घरी परतणे गरजेचे होते किंवा जिथे खाण्या पिण्याची सोय होऊ शकेल अशा ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे होते. नागरिकांची हतबलता आणि त्यातून झालेले उल्लंघन आणि परिणामस्वरूप नोंदवले गेलेले गुन्हे याचा दिर्घकालीन परिणाम त्यांच्यावर होणार आहे. यात समावेश असणार्या विद्यार्थांना पुढील करिअरसाठी अडचणी येत आहेत.
शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये हे तत्व आपल्या न्यायव्यवस्थेचे असल्याचे वारंवार म्हटले जाते. याच अनुषंगाने विचार केला तर गेल्या दीड वर्षात कलम 144, कलम 188 अंतर्गत नोंदवलेल्या नागरीकांमध्ये निम्याहून अधिक जण हे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणारे आहेत. हतबलतेतून नियमांचे उल्लंघन केलेले आहेत. कायद्याच्या भाषेनुसार ते गुन्हे नोंदवल्यामुळे गुन्हेगार ठरत असले तरी वास्तव हे आहे की ते गुन्हेगार नाहीत. टाळेबंदी काळात नोंदवलेल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये अशा हजारो व्यक्ती आहेत की ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची बिलकुलच नाही. त्यामुळे सरकारने कोरोना प्रोटोकॉल उल्लंघन अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करून पूर्णपणे मागे घ्यावेत. सरसकट गुन्हे मागे घेण्याचा पर्याय सरकारला रास्त वाटत नसेल तर दुसरा मार्ग म्हणजे कायद्याचा योग्य सन्मान आणि हतबलतेतून गुन्हेगारीचा बसलेला शिक्का याचा विचार करत संबंधित व्यक्तींना सरसकटपणे विशिष्ट दंड आकारून गुन्हे निकालात काढावेत. या पूर्वी देखील सरकारने वेळोवेळी अनेक वेळेला विविध आंदोलने, मोर्चे, अगदी दंगली संदर्भातील गुन्हे देखील मागे घेतलेले आहेत. त्यामुळे सरकार साठी गुन्हे मागे घेणे अगदीच नाविन्यपूर्ण आहे असे नक्कीच नाही. कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची संख्या लक्षात घेता सदरील गुन्हे बोर्डावर येऊन त्या प्रकरणांचा निकाल लागण्यासाठी किमान 5/10 वर्षे तरी लागणार हे नक्की. अशा परिस्थितीत अनेक नागरिकांवर गुन्ह्याची टांगती तलवार अटळ असणार आहे. हा प्रकार अनेकांची अग्निपरीक्षा पाहणारा असणार आहे. टाळेबंदीचा प्रमुख उद्देश हा नागरिकांच्या हालचालीवर निर्बध हा होता. तो उद्देश शास्त्रीय दृष्टीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपयुक्त होता की नाही हा वादाचा विषय असला तरी आपण सदरील आपद्कालीन परिस्थितीतून बर्यापैकी बाहेर पडलेलो आहोत. त्यामुळे सरकारने टाळेबंदीच्या अनुषंगाने गुन्हे व्यापक दृष्टिकोनातून मागे घेण्याचा सकारात्मक विचार करावा अशा मागणीचे पत्र सुधीर दाणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai