Breaking News
कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा राज्यपाल कार्यालयाचा खुलासा
नवी मुंबई : राज्यात सरकार स्थापनेसाठी बंडखोर शिवसेना व भाजपने पाठिंबा दिल्याबाबतची पत्रे राज्यपाल सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी मागितलेल्या माहितीला उत्तर देताना राज्यपाल कार्यालयाकडून हा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यपाल कार्यालयाच्या खुलाश्याने पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईतील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी शिंदे-फडणवीस यांनी सरकार स्थापनेच्यावेळी शिवसेना व भाजपने एकमेकांना दिलेल्या पाठिंब्याची पत्रे मागितली होती. या पत्रांसोबत शिवसेना व भाजपच्या कार्यकारी मंडळाच्या ठरावाची प्रतही त्यांनी महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयात मागितली होती. सदर अर्ज हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. 23 ऑगस्ट रोजी राज्यपाल सचिवालयाकडून सदर कागदपत्रे व ठराव उपलब्ध नसल्याचे उत्तर जाधव यांना देण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी सरकार स्थापनेपुर्वी आपल्याकडे असलेल्या बहुमताचा आकडा राज्यपालांकडे सादर करणे भाजपला बंधनकारक होते. यावेळी भाजपला कोणकोणत्या पक्षाचा तसेच अपक्षांचा पाठिंबा असल्याचे पत्र सोबत जोडणे आवश्यक होते. संबंधितांकडे आवश्यक संख्याबळ आहे हे पाहूनच मग राज्यपालांनी संबंधितांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देणे आवश्यक होते. परंतु, बंडखोर शिवसेना व भाजप यांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणारी कागदपत्रे व प्रादेशिक कार्यकारी मंडळाचे ठराव दिले नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांना राज्यपाल सचिवालयाने दिलेल्या खुलाशावरुन सकृतदर्शनी दिसत आहे. त्यामुळे अधिकृत पाठिंबा पत्राशिवाय राज्यपालांनी संबंधितांना सरकार स्थापनेसाठी दिलेल्या आमंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यपालांच्या कार्यालयाच्या या खुलाशामुळे शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकार स्थापन होताना राज्यपालांनी अवलंबलेली पद्धत जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवली. दिलेले उत्तर धक्कादायक असल्याने ते सार्वजनिक केले आहे. अद्याप राज्यपालांकडे काही माहिती असल्याने ती देण्यात आलेली नाही. ती मिळाल्यास राज्यातील सत्तांतरावर बराच प्रकाश पडेल. - संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे