Breaking News
देशातील वाढता द्वेष, धर्मा-धर्मातील तेढ आणि देशाच्या सार्वभौमतेला असलेला धोका विचारात घेऊन राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरु केली आहे. हि यात्रा 3570 कि.मीची असून कोणतेही ऐषारामी नियोजन या यात्रेत नसून जेथून हि यात्रा जाईल तेथील लोकांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. स्थानिक लोकांकडेच ते जेवणार असून एखाद्या धर्मशाळेत किंवा शाळेत ते राहणार आहेत. त्यांनी घेतलेला हा निर्णय खूपच धाडसी असून त्यामुळे त्यांना संपूर्ण भारत जवळून पाहता येणार आहे. लोकांशी थेट संवाद साधता येणार आहे. त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्व विकासासाठी ते अतिशय लाभदायक ठरेल. पंडित नेहरूंनी त्यांच्या नजरेने शोधलेला आणि लेखणीतून उतरवलेला भारत त्यांना नव्याने अनुभवता येणार आहे. हा प्रवास जरी खडतर असला तरी जसजशी हि यात्रा पुढे सरकेल तसतशी नवसंजीवनी काँग्रेस पक्षाला मिळेल. या यात्रेचे नाव जरी भारत जोडो असले तरी मुळात या यात्रेचा उद्देश प्रामुख्याने ‘मतदार जोडो’ साठीच असणार आहे.
देशात पंजाब प्रांतात आतंकवादाने डोकं वर काढल्यावर देशाची अखंडता आणि सामाजिक सौहादर्य कायम राहावे म्हणून समाज सेवक बाबा आमटे यांनी कन्याकुमारी ते काश्मीर सुमारे 5042 कि.मी. चे भारत जोडो अभियान 1986 साली हाती घेतले होते. देशात वाढलेली कट्टरता, धार्मिक द्वेष आणि दिल्लीत शिखांची झालेली कत्तल यामुळे देशाच्या अखंडतेला असलेला धोका लक्षात घेऊन बाबा आमटे यांनी हि यात्रा हाती घेतली. देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनीही 1983 साली भारत जोडो अभियान यात्रा काढली होती. तामिळनाडूपासून सुरु झालेल्या या यात्रेची सांगता दिल्लीतील राजघाट येथे झाली. त्यांनीही चार हजार किलोमीटरचे अंतर चालत पार केले. दोन्हीही यात्रांचा उद्देश हा वेगळा होता. आमटे यांचा सामाजिक दृष्टिकोन तर चंद्रशेखर यांचा राजकीय दृष्टिकोन होता. दोन्हीही व्यक्तीमत्त्वे त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग होती त्यामुळे त्यांच्या यात्रेला मोठे यश तर मिळालेच शिवाय त्यांनी ज्या उद्दीष्टाने या यात्रा काढल्या त्या सफलही झाल्या. याउलट राहुल गांधीची प्रतिमा असून त्यांना या यात्रेच्या माध्यमातून आपली छाप भारतीयांवर पाडण्यास संधी मिळणार आहे.
देशात सध्या प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि धार्मिक उन्माद वाढला आहे. मतांच्या धृविकरणासाठी समाजा-समाजात द्वेष पसरवला जात आहे. सरकारची आर्थिक पातळीवरील असफलता झाकण्यासाठी धर्माची गोळी प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे समाजाला दिली जात आहे. विरोधकांना आणि सरकारविरोधी आंदोलनांना प्रसारमाध्यमांनी लोकांच्या नजरेतून जाणीवपूर्वक हद्दपार केले आहे. अशावेळी जनतेशी थेट संवाद एव्हढाच एक पर्याय विरोधकांकडे असून त्या दृष्टीने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आयोजन महत्वाचे ठरते. यापूर्वी राहुल यांनी राजकारण कधीच गांभीर्यपूर्वक घेतले नाही. एखादा मुद्दा घ्यायचा, त्यावरून रान पेटवायचे आणि परदेशात निघून जायचे असे त्यांच्या बाबतीत वारंवार घडले आहे. अभ्यास न करता केलेल्या भाषणांमुळे त्यांना ‘पप्पू’ म्हणून हिणवणे भाजपाला सहज शक्य झाले. त्यामुळे त्यांचा जनतेवर म्हणावा तसा प्रभाव पडू शकला नाही. आता तरी राहुल गांधी राजकारण हे पार्टटाइम म्हणून न करता मोदींसारखे पूर्णवेळ राजकारणी होऊन जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील अशी अपेक्षा या यात्रेच्या माध्यमातून करायला हरकत नाही.
2024 ला होणार्या लोकसभेची निवडणूक नजरेसमोर ठेवून भाजपसह विरोधकांनी आपली तयारी सुरू केली आहे. भाजपने महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि दिल्ली येथे ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राव्यतिरिक्त त्यांना इतर राज्यात त्यांना यश आले नाही. उलट बिहारमध्ये ऑपरेशन लोटस सुरू होण्यापूर्वी नितीश कुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडून तेजस्वीला जवळ केले. 38 खासदारांचे राज्य भाजपच्या हातातून गेले असून नितीश कुमार यांनी लोकसभेसाठी विरोधकांची मोट बांधण्यात सुरुवात केली आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीच्या तयारीसाठी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. गांधी यांची भारत जोडो यात्रा 12 राज्यातून जाणार असून लोकसभेच्या 371 मतदारसंघातील लोकांशी संवाद साधणार आहे. गेल्या निवडणुकीत या बारा राज्यातून काँग्रेसला 38 जागा मिळाल्या होत्या. येत्या दोन वर्षात यापैकी नऊ राज्यांमध्ये निवडणुका आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटक व मध्य प्रदेश जिंकले होते तर गुजरात मधील सत्तेचे गणित थोडक्यात हुकले होते. भाजपाच्या ऑपरेशन लोटसमुळे कर्नाटक आणि मध्यप्रदेश हि दोन्ही राज्ये काँग्रेसला गमवावी लागली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम हा येत्या काही महिन्यात देशात होणार्या नऊ राज्यातील निवडणुका दिसणार आहे. त्याचबरोबर विरोधकांचीही आघाडी या राज्यांच्या निवडणुकीत कितपत होते यावर 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे भवितव्य आहे.
देशात सध्या सत्तेचा अनिर्बंध गैरवापर सुरू असल्याचे चित्र असून सरकारचे धोरणात्मक निर्णय हे विशिष्ट वर्गासाठी असल्याची भावना लोकांची आहे. देशात प्रचंड महागाई व बेरोजगारी असून विकासाचा दर नवीन नीचांक धारण करत आहे. सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी करत असल्याने विरोधकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. देशात धर्मांधतेचा अतिरेक वाढत असून त्यामुळे देश यादवीच्या उंबरठ्यावर आहे. द्वेषाने माणसे माणसांची वैरी होतात व त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतात. गेल्या आठ वर्षात उभी राहिलेली द्वेषाची भिंत पाडण्यासाठी, जनतेला एकत्र आणण्यासाठी भारत जोडो सारख्या यात्रेची खरोखरच आवश्यकता होती. अशा यात्रा पक्षाच्या प्रचारात आणि जनमत संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा यात्रांनी भाजपाला यापूर्वी बरेच यश दिले आहे. त्यामुळे राहुल गांधी भारत जोडो यात्रेतुन किती जनाधार जोडतात त्याचे फलित येत्या निवडणुकांत दिसेल. निवडणुका जिंको वा हरो राहुल यांनी आपली प्रतिमा जरी या यात्रेतून बदलली तरी त्याचा निश्चित फायदा काँग्रेसला पर्यायाने होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे