Breaking News
संजय मुखर्जींच्या निर्णयाच्या चौकशीची मागणी
नवी मुंबई ः अविनाश भोसले यांच्या नेरुळ येथील मेट्रोपोलीस हॉटेल भूखंडाचा वापर बदल व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. या भुवापर बदलाने सिडकोला 315 कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. सदर पत्राची प्रत सिडकोच्या सर्व विद्यमान संचालकांना पाठवून या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी सुर्वे यांनी केली आहे.
सिडकोने 2008 साली 47 हजार चौ. मी.चा नेरूळ सेक्टर 46 ए मधील भूखंड क्रमांक पाच पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी अविनाश भोसले यांच्या मालकीच्या मेट्रोपोलीस हॉटेल यांना वितरीत केला होता. सदर भूखंड वाटप, भूखंडाचे दोन भाग करणे आणि एका भागाचा भुवापर बदल करणे नियमबाह्य असल्याचे शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालात नमूद करून सदर भूखंड वाटप रद्द करण्याची शिफारस केली होती. सिडकोने संबंधित भूखंड वाटप रद्द केल्यानंतर मे. मेट्रोपोलीस हॉटेल्स यांनी सिडकोच्या वरील निर्णयास उच्च न्यायालय मुंबई येथे आव्हान दिले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनीही ही जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळून लावत सिडकोचे भूखंड वाटप नियमित असल्याचा निर्वाळा दिला आणि या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे वरील आदेश प्राप्त झाल्यावर मे.मेट्रोपोलीस हॉटेलने उर्वरित 24000 चौ.मी.भूखंडाचेहि भूवापर बदल करण्याचे पत्र 21 मार्च 2022 रोजी सिडकोला दिले. नवी मुंबई महानगरपालिकेनेही सदर भुवापर बदल करण्यास आपली संपत्ती असल्याचे पत्र 30 मार्च रोजी सिडकोला दिले. नियोजन प्राधिकरणाची संमती प्राप्त झाल्यावर सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सदर भूखंडास हॉटेल भुवापर ऐवजी रहिवासी-वाणिज्य वापर मंजुर केला. त्याबाबतचे ना हरकत दाखला नवी मुंबई महानगरपालिकेला 6 एप्रिल 2022 रोजी देण्यात आला. सिडकोने संचालक मंडळाच्या 2020 च्या ठरावानुसार सदर भुवापर बदलापोटी प्रति चौ.मी. 4500 प्रमाणे मे. मेट्रोपोलीस हॉटेल्स यांच्याकडून 10.50 कोटी रुपये सिडकोने वसूल केले. सिडकोच्या या भुवापर बदल व्यवहाराला सामाजिक कार्यकर्ते संजय कुमार सुर्वे यांनी विरोध केला असून सदर व्यवहारामुळे सिडकोला 315 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप सुर्वे यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सुर्वे यांनी आपल्या तक्रारीत मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या काही खटल्यांचा दाखला दिला असून या निर्णयानुसार जर कोणत्याही सरकारी जमिनीचा भू-वापर बदलायचा असेल तर पूर्वीचा व्यवहार रद्द करून बदललेल्या भू-वापरासह नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी असे अनेक आदेश यापूर्वी न्यायालयाने अनेक प्रकरणात दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. भुवापर बदलाने जर भूखंडाचे बाजारमूल्य बदलत असेल तर बदललेले मूल्य हे सरकारी तिजोरीत आले पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे सुर्वे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. मेट्रोपोलीस हॉटेल यांनी सिडकोसोबत 27 एप्रिल 2022 रोजी नव्या भुवापरासाठी केलेला सुधारित करारनामा हा 155 कोटी रुपयांचा असून भूवापर बदल मंजूर झाल्यानंतर सदरचा भूखंड 470 कोटी रुपयांना अविनाश भोसले यांनी बालाजी कॉर्पोरेशनला विकला आहे. मुखर्जी यांनी मंजूर केलेल्या सदर भूवापर बदलामुळे अविनाश भोसले यांच्या मालकीच्या मे. मेट्रोपोलीस हॉटेल यांना 315 कोटीचा घसघशीत नफा झाल्याचे सुर्वे यांनी मुख्यसचिवांना दिलेल्या तक्रारीत पुराव्यासह नमूद केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार भोसले यांना जर सदर भूखंडावर हॉटेल बांधायचे नव्हते तर सदर भूखंड सिडकोला परत देणे आवश्यक होते. त्यानंतर जर सिडकोने नवीन भूवापरासह निविदा प्रक्रिया राबवली असती तर 315 कोटी रुपये सिडकोच्या तिजोरीत जमा झाले असते असे सुर्वे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुखर्जी यांच्या या आतबट्ट्याचा व्यवहाराने सिडकोला 315 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप सुर्वे यांनी करत सिडकोच्या सर्व संचालकांनी मुखर्जी यांच्या निर्णयाचा फेर आढावा घेण्याची विनंती केली असून त्यांच्या तक्रारीला शासन आणि सिडकोचे संचालक कशा पद्धतीने प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत सिडकोचे म्हणणे जाणून घेण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्याशी संपर्क केला असता ते शहराबाहेर असल्याने प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचे जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी सांगितले.
असा झाला झोल
मी या प्रकरणाचा 2008 पासून पाठपुरावा केला आहे. न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरी मी क्युरेटीव्ह याचिका दाखल केली आहे. सिडकोने भुवापर बदलाचा निर्णय न बदलल्यास पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. - संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे