Breaking News
आराखड्यात सदर जागेचे वाहतुक भू-वापरात परिवर्तन
नवी मुंबई ः महानगरपालिकेने नागरिकांच्या सूचना व हरकतीसाठी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. सदर विकास आराखड्यात पालिकेने सीवूड्स रेल्वे स्थानक येथील एल अँड टी कंपनीला दिलेल्या रहिवाशी बांधकाम परवानगीच्या जागेवर वाहतूक भू-वापर दाखवल्याने सदर गृहप्रकल्प अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतःच दिलेल्या बांधकाम परवानगीचा विसर पालिकेला पडल्याने या गृहप्रकल्पात गुंतवणूक केलेल्या हजारो ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबई सीवूड रेल्वे स्थानक आणि शेजारील मोकळ्या 16.2 हेक्टर जमिनीवर वाणिज्य वापरासाठी आयकॉनिक वास्तु उभारण्यासाठी सिडकोने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली होती. एल अँड टीने या भूखंडाला त्यावेळचा सर्वात मोठा दर देऊन सदर भूखंड विकासाचे काम मिळवले. सदर भूखंड ताब्यात आल्यानंतर त्यावर रहिवाशी वापर मंजूर करण्यासाठी एल अँड टीने 2009 पासून सिडकोकडे पाठपुरावा केला होता. 2010 मध्ये तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जी.एस.गिल यांनी या जागेवर रहिवाशी वापर तत्वतः मंजूर केला. परंतु शासनाने नेमलेल्या टी. एस. बेंजामिन समितीने रेल्वेस्थानक क्षेत्रात रहिवाशी भूवापर मंजूर करणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने सदर भू-वापर बदल रद्द करण्याची शिफारस शासनास केली. चौकशी समितीच्या शिफारसी वरून सिडकोने सदर रहिवाशी भूवापर बदल रद्द केल्याचे एल अँड टी ला कळवले.
सदर प्रकल्पाला भू-वापर बदल देऊ नये म्हणून सिडकोच्या नियोजन विभागाने प्रखर विरोध केला होता. त्याचबरोबर सिडकोच्या ट्रान्सपोर्टेशन विभागाच्या अधिकार्यांनीही हा भूखंड वाहतूक वापरात मोडत असल्याने त्यावर रहिवाशी वापर देणे योग्य नसल्याचे मत फाईलमध्ये नोंदवले होते. परंतु एल अँड टी ने भूवापर बदल आणि इतर प्रलंबित विषय मार्गी लागावे म्हणून शासनाकडे अर्ज केल्यावर सिडकोने तत्कालीन सचिव बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीला सिडकोच्या भूवापर बदल समितीनेही सदर भूखंड वापरबदल देण्यास विरोध कळवला होता. नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सदर भूखंड वापर बदल देणे शक्य नसल्याचे कळवून सिडकोने स्वतः भूवापर बदल केला तर रहिवाशी वापराची परवानगी पालिका देईल असे सिडकोला कळवले. सिडकोने सदर भूवापर बदल मंजूर केला आणि सुधारित भाडेपट्टा करार करून प्रचलित बांधकाम नियमावलीनुसार रहिवासी वापर मंजूर केल्याचे पालिकेला कळवले. त्या अनुषंगाने 2019 मध्ये सदर भूखंडास पालिकेकडून वाणिज्य-रहिवाशी वापराची बांधकाम परवानगी देण्यात आली.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखड्यात सीवूड्स रेल्वे स्थानक आणि सभोवतालच्या जागेचा भूवापर हलक्या नारंगी रंगाने दाखवला असून हा रंग वाहतूक भूवापर दर्शवितो. पालिकेने विकास आराखड्यात दर्शविलेल्या या भू-वापरामुळे सदर भूखंडावरील बांधकाम अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रारूप विकास आराखड्यात रहिवाशी वापर पिवळ्या रंगाने दर्शवला असून वाहतूक वापर हा हलक्या नारंगी रंगाने दाखवला आहे. त्यामुळे प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करताना स्वतःच दिलेल्या रहिवाशी वापर बांधकाम परवानगीचा विसर पालिकेला पडल्याने त्या गृहप्रकल्पात गुंतवणूक करणार्या हजारो ग्राहकांच्या हृदयाचे ठोके चुकले आहेत. लवकरात लवकर पालिकेने ही चूक सुधारावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. आता प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याने पालिकेच्या या कृतीवर जास्तीस जास्त हरकती नोंदवण्याचे आवाहन या गृहप्रकल्पात घरे घेणार्यांना करण्यात येत आहे.
प्रारुप विकास आराखड्यात सदर भूवापर ट्रान्सपोर्टटेशन मथळ्याखाली दाखवला आहे. पालिकेने त्यांना रहिवाशी आणि वाणिज्य वापर मंजुर केलेला आहे. सदर आराखडा सूचना व हरकतींसाठी प्रसिद्ध् केलेला असल्याने हरकत प्राप्त झाल्यास योग्य ती दखल पालिकेच्या नगररचना विभागाकडून करण्यात येईल. - अभिजीत बांगर, आयुक्त
सिडकोच्या नियोजन विभागाचा विरोध
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे