Breaking News
दरवर्षी दसर्याला आवाज कुणाचा... असा हाकारा देत राज्यातून तमाम शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी येतात. ही परंपरा शिवसेना स्थापनेपासून अखंड सुरू आहे. बाळासाहेबांच्या पश्चात ही प्रथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू ठेवली असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचे जाहीर केल्याने यावेळी या प्रथेला खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर्षी उद्धव ठाकरेंच्या सेनेचा मेळावा शिवतीर्थावर होईल की नाही अशी शंका शिवसैनिकांच्या मनात होती. परंतु उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा अर्ज प्रथम आला या कारणाने त्यांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास मान्यता दिली. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनीही बीकेसी येथील ग्राउंडवर आपल्या सेनेचा वेगळा मेळावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यावेळी मुंबईत शिवसेनेचे दोन आवाज घुमणार असले तरी शिवसैनिकांच्या प्रतिसादावर मुंबईत ‘आवाज कुणाचा...’ हे निश्चित होणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले.
शिवाजी पार्क आणि शिवसेना यांचे अतूट नाते आहे. शिवसैनिक शिवाजीपार्कला शिवतीर्थ म्हणून संबोधतात. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी कधीही शिवाजीपार्कवरील बाळासाहेबांच्या सभेला विरोध केला नाही. मध्यंतरी ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली त्यावेळी शिवाजी पार्कवर सभा घेण्याची नवीन परंपरा राज ठाकरे निर्माण करतील अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु राज यांनी मनाचा मोठेपणा आणि बाळासाहेबांबद्दल असलेला आपला जिव्हाळा दाखवत त्यांनी अशा प्रकारचा उद्दामपणा कधीच केला नाही. शिवसेनेतून चाळीस आमदार घेऊन बाहेर पडलेल्या आणि मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांनी मात्र शिवाजी पार्कवर आपण शिवसैनिकांचा मेळावा घेणार असे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेने त्यांनी मनाचा कोतेपणा दाखवलाच त्याचबरोबर बाळासाहेबांच्या विचारांना नख लावण्याचं काम केलं. खरंतर शिवसेनेतून बंड केल्यानंतर किंवा वेगळे झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग चोखाळायला हवा होता. तसे न करता ते उद्धव ठाकरेंचे खच्चीकरण, शिवसेनेचे खच्चीकरण करण्याच्या नादात मराठी माणसाचे नुकसान करत आहोत याचे भान ठेवले नाही जे आक्षेपार्ह्य आहे. एकाच ठिकाणी मेळावा घेण्याचा प्रयत्न झाला असता तर कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली असती पर्यायाने ती मराठी माणसाची फुटली असती याचे भान एकनाथ शिंदे यांनी ठेवणे गरजेचे होते.
बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने न्यायालयीन आणि जमिनीवरील लढाई लढत आहेत त्यावरून त्यांचे लक्ष वेगळेच असल्याचे जाणवते. शिंदेंची कुवत नसताना ज्या पद्धतीने शिंदे विचारपूर्वक सेनेवर एकामागून एक ‘प्रहार’ करत आहेत, त्यावरून शिंदे यांच्यामागे अनेक चाणक्य चाली खेळत आहेत हे नक्की. एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यापलीकडे फारशी ओळख नाही, राजकीय दबदबा नाही, राजकीय वकूब नाही अशा परिस्थितीत त्यांनी आमचीच शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याचे सांगणे म्हणजे ‘नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा’ असा हा प्रकार आहे. मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे घेतलेली पत्रकार परिषद किंवा अनेक समारंभात त्यांची भाषणे बघितली तर त्यांचा वकुब दिसून येतो. राज्यात घडत असलेल्या घडामोडींवरून शिंदे हे कोणाचे तरी प्यादे म्हणून काम करत असल्याचे दिसत आहे. शिवसेना संपल्यास त्याचा फायदा कोणाला होईल याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे यांनाच लक्ष करून त्यांना बंडखोरी करण्यास भाग पाडले यामागे एक निश्चित रणनीती दिसून येते.
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 32 टक्के योगदान हे महाराष्ट्राचे असून या राज्याची सत्ता हातात असणे हे प्रत्येक पक्षाचे स्वप्न असते. परंतु 2019 साली युतीत लढून बहुमत मिळवूनही सत्ता न मिळाल्याने भाजपच्या सत्तेच्या स्वप्नांचा चुराडा उद्धव यांनी केला. नुसता स्वप्नांचा चुराडा झाला नाही तर मोदींच्या स्वप्नांना तिलांजली देण्याचे काम त्यांनी केले. मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा बुलेट ट्रेनची एकही वीट गेल्या तीन वर्षात राज्यात रचली गेली नाही. त्याचबरोबर फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय महाविकास आघाडीने फिरवल्याने त्याचा फटका भाजपला बसला. अशावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राची सत्ता कशाही पद्धतीने मिळवणे हे मोदी-शहा यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी शिंदेंसारखा मोहरा शोधला आणि महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर घेतलेल्या निर्णयांची जंत्री पाहिली तर सर्व निर्णय हे आरे कारशेड, बुलेट ट्रेन संदर्भातील आहेत हे दिसून येईल. त्याचबरोबर याच सरकारच्या काळात फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. शिंदे यांचा फायदा भाजपाला राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी होणार आहे. शिंदे याची पकड ठाणे जिल्ह्यावर असून या जिल्ह्यातून 28 आमदार निवडून येतात. मागच्यावेळी हुकलेले बहुमत त्यांना यावेळी ठाणे जिल्ह्यातून भरून काढायचे आहे. त्यासाठी त्यांनी शिंदे यांना लक्ष केले आणि ईडापीडा टाळण्यासाठी अखेर शिंदेनी बंडखोरी केली.
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरेसेना आणि शिंदेगट मुंबईत मेळावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा मेळावा हा सालाबादप्रमाणे दसर्याच्या मुहूर्तावर होतच असतो परंतु या वेळी बंडखोर सेनेचाही मेळावा बीकेसीत होणार आहे. उभ्या महाराष्ट्राचे लक्ष या दोन्ही मेळाव्याकडे लागले असून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो त्यावरून शिवसेना कोणाची हे निश्चित होईल असे प्रसारमाध्यांद्वारे भासवले जात आहे. त्यासाठी शिंदे यांच्याकडून जोरदार तयारी सुरू असून कशाही पद्धतीत या मेळाव्याला लाखोंची उपस्थिती ठेवण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या बंडखोर आमदारांवर तसेच मित्रपक्षांना दिली आहे. ठाकरे यांची भीस्त त्यांच्या निष्ठावान शिवसैनिकांवर आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्हीकडून कंबर कसली जात आहे. दोन्ही मेळाव्यात येणारे शिवसैनिक ‘आवाज कुणाचा...’ असा हाकारा देत मुंबईत येतील पण ज्याच्याकडून विचारांचे सोने मिळेल तोच पक्ष खर्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा सांगणारा ठरणार आहे. त्यामुळे शिंदे कोणता विचार खोक्यातून बाहेर काढून बीकेसीवर उधळतात आणि उद्धव कोणत्या विचारांचा वारसा शिवसैनिकाला देतात याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. त्यामुळे दसरा मेळावा हे जरी निमित्त असले तरी आवाज कोणत्या सेनेचा हे या निमीत्ताने निश्चित होईल...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे