Breaking News
नवी मुंबई ः कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभर एप्रिल व मे मध्ये कर्फ्यु लॉकडाऊन लावला होता. या लॉकडाऊनचा फायदा घनकचरा विभागाने उचलत ठेकेदाराला एप्रिल व मे महिन्यात न केलेल्या साफसफाईचे 1 कोटीहून अधिक रुपयांचे बिल अदा करुन तिजोरीची सफाई केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. जानेवारी 2021 मध्ये याबाबत तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार प्राप्त होऊनही अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोना संक्रमणामुळे 22 मार्च 2022 पासून सुरुवातीला 8 दिवसांचे लॉकडाऊन केंद्र सरकारने देशभरात लागू केले होते. त्यानंतरही कोरोना संक्रमण आटोक्यात न आल्याने एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कर्फ्यु लॉकडाऊन लावण्यात आला होता. याकाळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु होत्या. आरोग्य विभाग, जिवनावश्यक वस्तुंची वाहतुक आणि शहराची साफसफाई सेवा यांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते. रेल्वे आणि बस वाहतुक पुर्णपणे बंद होत्या. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी विशेष बस वाहतुक सुरु ठेवण्यात आली होती. सर्व महत्वाच्या रस्त्यांना बॅरिकेट्स लावून पोलीसांनी वाहतुक बंद केली होती. फक्त अॅम्ब्युलन्स व जिवनावश्यक वस्तुंच्या गाड्या सोडण्यात येत होत्या.
या कर्फ्यु लॉकडाऊन काळात पालिकेच्या घनकचरा विभागाने मात्र शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करुन कोरोनावर मात करण्याचा अभिनव उपक्रम उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी केल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. एप्रिल आणि मे या कालावधीत राजळे यांनी परिमंडळ 1 व 2 येथे साफसफाई करणार्या मे. बीव्हीजी इंडिया लि. व मे. अॅन्टोनी वेस्ट हँडलिंग प्रा. लि. यांना एप्रिल महिन्यातील सफाईसाठी 25 लाख 28 हजार 820 रु. व 27 लाख 41 हजार 442 रु. अनुक्रमे अदा केले आहेत. मे महिन्यासाठी अनुक्रमे ही रक्कम 26 लाख 5 हजार 932 रु. तर 28 लाख 20 हजार 792 रु. आहे. म्हणजेच 1 कोटीहून अधिक रक्कम घनकचरा विभागाने कर्फ्यु लॉकडाऊन काळात तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या कार्यकाळात न केलेल्या साफसफाईसाठी ठेकेदाराला अदा केल्याची चर्चा पालिकेत आहे.
तत्कालीन पालिका आयुक्त अभिजीत बांगर व मुख्यलेखापरिक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार प्राप्त झाली असतानाही त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई या तक्रारीवर केली नसल्याचे बोलले जात आहे. राजळे यांच्या मंत्रालयातील थोर दबावामुळे या तक्रारीवर कारवाई न झाल्याची चर्चा महापालिकेत आहे. विद्यमान आयुक्त राजेश नार्वेकर या तक्रारीवर काय पावले उचलतात याकडे आता पालिका कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे