नोटांवर लक्ष्मी अवतरली तर...
- by संजयकुमार सुर्वे
- Nov 04, 2022
- 947
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे दिवसेंदिवस अवमूल्यन होत असून आता एक डॉलरची किंमत 83 रुपये झाली आहे. यावर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपया अशक्त होत नसून डॉलर सशक्त झाल्याचे कारण अमेरिकेमध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिले आहे. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय रुपयावर लक्ष्मी मातेचा व गणपतीचा फोटो छापून रुपयाचे अवमूल्यन रोखण्याचा नामी संदेश भारतीय सरकारला दिला. हे वक्तव्य करण्यासाठी त्यांनी साधलेले टायमिंग हेेही अचूक होते. त्यावेळी दिवाळीचे दिवस होते आणि सर्वजण लक्ष्मीपूजनाच्या दिनचर्येत व्यग्र होते. केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर देशात भारताच्या चलनावरील फोटो बाबत अनेक प्रतिक्रिया राजकर्त्यांकडून व्यक्त झाल्या. कोणी शिवाजी महाराजांचा फोटो, कोणी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नोटांवर छापण्याच्या सूचना भारत सरकारला केल्या. खंरतर केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यात दोन अर्थ दडलेले आहेत. केजरीवाल यांनी केलेली सूचना स्वीकारावी का फेटाळावी या कात्रीत केंद्र सरकार सापडले आहे.
देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून येत्या दोन महिन्यात गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणुका होणार आहेत. पंजाब जिंकल्यानंतर केजरीवाल यांनी मोदींचा अश्वमेध गुजरातमध्ये रोखण्याचा निर्धार केल्याचे त्यांच्या रणणितीवरुन दिसत आहे. सध्या तेथे हिंदुत्वाच्या प्रचाराने जोर धरला असून भाजपाचा प्रचार हा मंदिर आणि मशिद पलीकडे जातच नाही. संपूर्ण देशाला हिंदुत्वाच्या लहरीत गुंतवून या दोन्ही राज्यांच्या निवडणुका जिंकण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. हिमाचल प्रदेशाला देवभूमीही म्हटले जाते. त्यामुळे तेथे हिंदुत्वाचे कार्ड यशस्वी होईल असा विश्वास भाजपला आहे. या रणनीतीला छेद देण्यासाठी केजरीवाल यांनी ऐन दिवाळीत देशातील सर्वच हिंदू समाजात पुजल्या जाणार्या लक्ष्मी व गणपती या देवतांचे फोटो देशाच्या चलनावर टाकावे अशी सूचना केली. केजरीवाल यांच्या या सूचनेवर काय प्रतिक्रिया द्यावी यात भांबावलेल्या भाजपाला सुरुवातीला काहीच सुचत नव्हते. केजरीवालांकडून आपला हिंदुत्वाचा अजेंडा हायजॅक केला जातो कि काय अशी भीती त्यांना भेडसावत होती. ऐन दिवाळीत देवी लक्ष्मीचा आणि गणपतीचा फोटो टाकल्यास रुपया सशक्त होईल हे सांगणे म्हणजेच अंधश्रद्धेवरही एकप्रकारे प्रहार करण्यासारखे आहे. गेली हजारो वर्ष भारतीय घरात लक्ष्मी व सुबत्ता नांदण्यासाठी दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम करत असतात. लक्ष्मी पूजनाने देशातील लोक समृद्ध होत असतील तर सर्वसामान्य रुपयाला लक्ष्मी म्हणून पुजत असल्याने त्यावर लक्ष्मीचा फोटो टाकल्यास तो अजून सशक्त होईल असे केजरीवाल यांना सुचवायचे होते.
केजरीवाल यांनी आपल्या वक्तव्यातून एका दगडात अनेक पक्षी मारले. पहिले म्हणजे भाजपाला काही क्षण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी बॅकफूटवर लोटले आणि इतर पक्षांना त्यांनी कोणती भूमिका घ्यावी हे सुचेनासे केले. अनेक देशांच्या चलनावर त्यांनी इष्ट दैवतांना स्थान दिले आहे. त्यामुळे केजरीवालांनी केलेली सूचना तशी अव्यवहार्य नव्हती पण ती त्यांनी केल्याने मात्र सर्वांची गोची झाली. त्यांची सूचना स्वीकारल्यास देवी लक्ष्मी आणि गणेशजी भारतीय चलनावर आपल्यामुळे स्थानापन्न झाले आणि नाही स्वीकारली तर भाजपचे हिंदुत्व दुटप्पी म्हणून प्रचार करण्यास केजरीवाल मोकळे. भाजपच्या हिंदुत्वाच्या कार्डला फक्त केजरीवाल यांनी यशस्वी शह देण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी राहुल गांधी यांनी गळ्यात जानवे घालून अनेक मंदिरांना भेटी दिल्या पण त्याचा म्हणावा तसा लाभ काँग्रेसला झाला नाही. केजरीवाल यांनी यापूर्वी पंजाब मध्ये असेच दलित कार्ड खेळून विरोधकांचा पालापाचोळा केला. त्यांची हि खेळी यावेळी गुजरात आणि हिमाचलमध्ये यशस्वी होते की नाही हे येणार काळच ठरवणार आहे.
अल्पावधीत केजरीवाल यांनी राजकारणातील सर्वच हातखंडे आत्मसात केले आहेत. कधीकाळी जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्टी आयोजित करणारे चलनी नोटांवर लक्ष्मी गणेश अशी चित्रे लावण्यासह श्रीराम जन्मभूमी मंदिराचे दर्शन करण्याचा वायदा मतदारांना करत आहेत. काँग्रेसची व्होट बँक न फोडता गुजरात मधील हिंदू व्होट बँकेवर ते कब्जा करू इच्छित आहे. गुजरातमध्ये 88.57 टक्के हिंदू लोकसंख्या आहे व मुसलमानांची लोकसंख्या 9.67 टक्के आहे. त्यांच्या रणनीतीनुसार अल्पसंख्यांकांची शंभर टक्के मते घेण्यापेक्षा बहुसंख्यांकांची 15 ते 20 टक्के मते घेणे कधीही चांगले अशी त्यांची रणनीती आहे. गुजरात मध्ये भाजप व आप जोमात असताना काँग्रेसच्या निवडणूक आघाडीवर मात्र कमालीची सामसूम आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत व्यग्र असून ते गुजरात मध्ये पक्षाचा प्रचार करणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केजरीवाल यांनी केलेली सूचना ही भारतीय समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी होती असेहि म्हटल्यास वावगे ठरू नये. गेली हजारो वर्ष भारतीय समाज लक्ष्मी देवीची पूजा करत आहे. तिची पूजा केल्याने घरात धनधान्य आणि समृद्धी येते अशी भावना भारतीयांची आहे. त्यामुळे डॉलर समोर लक्ष्मी-गणेशाचे फोटो असलेला भारतीय रुपया उभा राहिला तर तो ताकदवान बनेल असा खोचक टोला त्यांनी अर्थमंत्री निर्मला सिताराम यांच्या वक्तव्याला लगावला आहे. खरंतर डॉलर समोर भारतीय चलन मजबुतीने उभे राहायचे असेल तर त्यासाठी भारतीय सरकारने निश्चित ध्येय धोरणे आखली पाहिजे, भारतात परकीय गुंतवणूक वाढून उद्योग धंदे कसे उभे राहतील आणि त्या अनुषंगाने प्रयत्न केल्यास भारताचा रुपया निश्चितच डॉलरसमोर ताकदीने उभा राहील. त्यासाठी इतर राज्यातील उद्योगधंदे पळवण्याची वेळ कोणत्याही राजकर्त्यावर येणार नाही. मग कोणत्याही भारताच्या अर्थमंत्र्याला ‘अॅक्ट ऑफ गॉड’ असे म्हणण्याची वेळ येणार नाही. दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजन करून भारतीय रुपया सक्षम होणार नाही तर परिश्रम आणि निश्चित ध्येयधोरणे आखून देशाचा आर्थिक गाडा हाकल्यास भारतीय रुपया हा डॉलरच्या तुलनेत उभा राहील हेच केजरीवाल यांना त्यामधून कदाचित सुचवायचे असेल. त्यामुळे नोटांवर लक्ष्मी अवतरली काय आणि नाही अवतरली काय? पण मतदानाच्यावेळी मात्र अवतरावी अशी अपेक्षा केजरीवाल यांना या घोषणेमागे असावी असे वाटते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे