अधिकारी-सल्लागाराच्या मिलीभगतने सीसीटीव्ही प्रकल्पात 40 कोटींचा चुना
- by संजयकुमार सुर्वे
- Nov 11, 2022
- 711
नवी मुंबई ः महापालिकेने हाती घेतलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पावरील वाद मिटण्याची शक्यता दिसत नसून या प्रकल्पाची किंमत 40 कोटींनी वाढवल्याची तक्रार पालिका आयुक्तांना प्राप्त झाली आहे. या तक्रारीत शहर अभियंता आणि अतिरिक्त शहर अभियंता यांचा सहभाग असल्याचा आरोप होऊनही आयुक्तांनी कोणतीही चौकशी या प्रकरणी न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत आता राज्य शासनाकडे दाद मागण्यात येणार असल्याचे तक्रारदार यांनी ‘आजची नवी मुंबई’ शी बोलताना सांगितले.
महापालिकेने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात नवी मुंबईत सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यासाठी केपीएमजी या तांत्रिक सल्लागाराची नेमणुक केली होती. केपीएमजीने बनवलेल्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने बनवलेल्या निविदेला प्रचंड दर आल्याने पालिकेने जुने अंदाजपत्रक भंगारात काढून नवीन सल्लागाराच्या मदतीने नवीन तांत्रिक तपशीलासह अंदाजपत्रक बनवले पण त्यास नवीन प्रशासकीय मान्यता घेतली की नाही हा मुद्दा वादातीत आहे.
हे अंदाजपत्रक शहर अभियंता यांच्या जवळच्या ‘तरुण’ सल्लागाराने बनवले असून त्यासाठी देशातील एका नामवंत कंपनीला हाताशी धरण्यात आले. या कंपनीच्या अधिकार्याने बाजारात आपण महापालिकेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निविदा बनवत असल्याचे सांगून अनेक कंपन्यांकडून कामात वापरण्यात येणार्या उपकरणांचे दर घेऊन त्याच कंपनीचे तांत्रिक तपशील निविदा अटी व शर्तीमध्ये घातले. त्यामुळे एल अँड टी, एनईसी सारख्या दर्जेदार कंपन्या या स्पर्धेतून आपोआप बाद झाल्या. हे काम विशिष्ट तरुण सल्लागार हाताळत असून त्याने नेरुळ येथील भिमाशंकर सोसायटीतील पत्त्यावर स्टार्टअप कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी आणि प्रमुख उत्पादक कंपनी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी टिमिंग अॅग्रीमेंट बनवले असून ज्या कंपन्यांनी अंदाजपत्रक बनवण्यासाठी दर दिले आहेत त्यांनी इतर कोणालाही साहित्य व सेवा न देण्याची अट या करारनाम्यात आहे. या स्टार्टअप कंपनीचे संचालक तरुण सल्लागाराचे वडील आणि पत्नी आहेत.
पालिकेने नेमलेल्या सल्लागाराने व अधिकार्यांनी संगनमताने मुळ निविदेत मोठा बदल केल्याने त्याची किंमत कमी झाली आहे. परंतु, निविदेत दर भरताना अंदाजपत्रका-पेक्षा कमी दराने भरले जातील याची दक्षता सर्वांनीच घेतल्याने पालिकेच्या डोळ्यात संबंधितांनी धुळ फेकल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. मुळ निविदेत बरेच बदल करण्यात आल्याने अंदाजपत्रक 90 कोटींपर्यंत येणे गरजेचे होते. परंतु, ते 137 कोटी रुपयांपर्यंत ठेवण्यात येवून निविदा 126 कोटींना देण्यात आली असे भासवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर वास्तविक पाहता, तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी सीसीटीव्ही प्रकल्पाचे पुर्ण अंदाजपत्रक शासनाच्या महिती व तंत्रज्ञान विभागाकडून फेरतपासणी करुन घेणे गरजेचे होते. परंतु, त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. पालिका अधिकारी आणि सल्लागार यांच्या मिलीभगतमुळे पालिकेला 40 कोटींचा चुना लागल्याची चर्चा पालिकेत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे