Breaking News
नवी मुंबई ः दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने खारकोपर आणि बामण डोंगरी येथील विक्रीस काढलेल्या घरांचे आभाळाला भिडणारे दर पाहिले की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची क्रूर चेष्टा सिडकोने चालवली आहे काय असा प्रश्न सर्वसामांन्यांना पडला आहे. यापूर्वीच्या पीएम आवास योजनांचे असलेले दर व 2022 मधील दर यामध्ये 92% टक्के दरवाढ झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सिडकोच्या या योजनेकडे पाठ फिरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने नवी मुंबईमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी तसेच अल्प उत्पन्न गटासाठी 95 हजार घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे वीस हजार कोटी रुपये असून ही घरे वाशी, जुईनगर, खारघर, तळोजा, बामणडोंगरी, खारकोपर येथे बांधण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बामणडोंगरी व खारकोपर येथे बांधण्यात येत असलेली 7850 घरांची लॉटरी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिडकोने काढली आहे. या लॉटरीत सिडकोने ठेवलेले घरांचे दर पाहिले की सिडको आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची चेष्टा तर करत नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
सिडकोने 2018 व 2019 मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत चौदा हजार घरांची निर्मिती करून जवळ जवळ सर्व घरे 2022 पर्यंत वितरित केली आहेत. या घरांचे क्षेत्रफळ 277 चौरस फूट असून त्यासाठी सिडकोने संबंधित आर्थिक दुर्बल घटकांना 18 लाख 32 हजार रुपये आकारले आहेत. परंतु सिडकोने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या लॉटरीत 322 चौरस फुटांच्या घरांचे दर 35 लाख 6 हजार रुपये असून हे दर वाटपपत्र निर्गमित करतेवेळी बदलण्याची अट सिडकोने घातली आहे. 2019 मध्ये सिडकोने आर्थिक दुर्बल घटकांसाठी ठेवलेले दर आणि 2022 मध्ये सिडको आकारीत असलेले दर यामध्ये जवळजवळ 92 टक्के दरवाढ सिडकोने केली आहे. सिडको अतिरिक्त 44 चौरस फुटांसाठी 17 लाख रुपये अधिक आकारात असल्याने सर्वसामान्य आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या प्रचंड दरवाढीने नाराज असलेले आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक सिडकोच्या या महागड्या घरांकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. लोकांनी सिडकोच्या या दरांबाबत सरकारकडे तसेच पंतप्रधान पोर्टलवरही तक्रार करत पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष वेधले आहे. लोकांच्या तक्रारीची दाखल सरकार कधी घेते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अनेक सामाजिक संघटनांनी सरकारकडे हे दर कमी करण्याची मागणी केल्याने सरकार कोणता निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे