Breaking News
दर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणार्या अभिनेत्री म्हणजे रिमा. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी - हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटविला. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्या मधून निघून गेल्या तरी त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून, या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले आहे.
घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं, याच घराविषयी आणि घरातील नात्यांविषयी भाष्य करणार्या ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि.यांची असून प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रस्तुतकर्ता आहेत. हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या या ‘होम स्वीट होम’ या चित्रपटात रिमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका होम स्वीट होम’ मध्ये आहेत. रिमा यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांनी 50 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांनी प्रथम मराठी रंगभूमी व मराठी चित्रपटामधून काम करण्यास सुरुवात केली. नात्यांच्या रिडेव्हलपमेंटवर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ येत्या 28 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai