Breaking News
राज्य विधानमंडळात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, असा प्रश्न अनेकदा पडतो. सत्ताधाऱ्यांना वाटतं आपण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची ओझी वाहणारा प्राणी म्हणजे विरोधक अशी एकूणच आखणी राज्य विधानसभेत आजकाल दिसू लागली आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यातच दोन्ही गटांचा कल दिसतो. आपण शहाण्यासारखं वागलं पाहिजे याचं भान आजच्या सत्ताधाऱ्यांना म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला राहिलेलं दिसत नाही. विरोधी पक्ष म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या विरोधी पक्षनेत्याने सत्ताधाऱ्यांच्या चरणी वाहिल्यात की काय, असा प्रश्न पडतो. राज्य विधानसभेत गुरुवारी घडलेल्या एका घटनेनंतर तर या म्हणण्याला अधिक बळकटी मिळत गेली. विषय होता तो विधिमंडळ सदस्यांच्या हक्कभंगाचा. कायद्याने दिलेल्या विशेषाधिकाराच्या कवचाला कोणी छेद पाडतं की काय अशी भीतीवजा संशय सत्ताधाऱ्यांना या दिवशी पडला होता. तो छेद पडू नये, ही जबाबदारी सभागृहातील सदस्यांचीही असते. या जबाबदारीला लाथाडळं तर विशेषाधिकार मागण्याचा अधिकार कोणालाच राहत नाही.
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आमदारांना प्रामुख्याने शिंदे गटाच्या आमदारांविषयी केलेल्या टिपण्णीने हा सारा तमाशा राज्याच्या जनतेला पाहायला मिळाला. एका वाहिनीवर एका प्रसंगी बनावट शिवसेना, डुप्लिकेट सेना असं सांगत हे विधिमंडळ नाही चोर मंडळ असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राज्य विधानसभेच्या अधिवेशनाचा एक दिवस सत्ताधाऱ्यांनी वाया घालवला. राज्यातले सत्ताधारी स्वत:ला विरोधी पक्ष का समजतो, आणि विरोधकांना आपण सत्तेवर उपकार करतो, असं चित्र सभागृहात का पाहायला मिळतं हे वरील घटनेवरून कळायला वेळ लागत नाही. राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने विधानमंडळातील सदस्यांचा हक्कभंग झाल्याचे दाखले अशिष शेलार यांनी दिले. हे दाखले म्हणून ठिक. पण हक्क म्हणून जबाबदारी कोण घेणार? राऊत यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र सार्वभौम सभागृहाचा अवमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नाही, हे खरं असलं तरी ज्या अधिकाराचा इतका पुळका भाजपला आहे त्या अधिकाराने सदस्य वागतात काय, हा खरा प्रश्न जनतेला पडलेला आहे. शेलार हे आपल्या सदस्यांना धुतल्या तांदळासारखे वाटत असतील तर शेलार राज्यातल्या जनतेला मूर्ख समजत आहेत, हे उघड आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून राज्य विधानसभेची सुरू असलेली अवहेलना पाहाता सभागृहाचा सर्वाधिक हक्क या सभागृहातील आमदारांनीच वेशिला टांगलेला दिसतो, त्याचं काय? घटनेने दिलेल्या अधिकाराचा वारेमाप अर्थ काढत प्रसंगी आपले अधिकार वेशिला टांगत शिवसेनेच्या आमदारांनी स्वत:ची सत्तेसाठी केलेली विक्री हा सभागृहाचा भंग नव्हता? भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या या सदस्यांनी विधानमंडळाच्या हक्काचे कसे बारा वाजवले हे देशभरातल्या जनतेने उघड्या डोळ्याने पाहिले. तेव्हा शेलार कुठे होते? ज्या घटनेचा आधार देशाच्या जडणघडणीसाठी घेतला जातो त्याच घटनेला गुंडाळून ठेवत सार्वभौम विधानमंडळाला जेव्हा दावणीला बांधलं जातं तेव्हा भाजपच्या आमदारांची बोलती का बंद होते? सत्तेसाठी कोणालाही विका अथवा खरेदी करा हा भाजपचा मंत्र सार्या देशभर सुरू असताना तेच हक्काच्या भंगाची तक्रार करतात यासारखा विनोद कोणता असू शकतो?
विधानमंडळ हे चोर मंडळ आहे, असं सांगणाऱ्या राऊत यांनी याहून कितीतरी गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांवर केलेले पाहायला मिळतील. पण सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधकांना कोंडीत पकडण्याचं निमित्त साधून भाजपचे नेते सगळ्यांनाच वेडं समजतात की काय? जे काम विरोधकांनी करायचं ते काम सत्ताधारी करतात आणि सभागृह रोखतात यावरून त्यांच्या अक्कलेचे निघालेले दिवाळे स्पष्ट दिसतात. ज्यांनी सभागृह चालवायचं तेच सभागृहात सत्तेला लाजवणारं कृत्य करतात. संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या मतांची पार्श्वभूमी लक्षात न घेताच सभागृहात आकांडतांडव करण्यात आला. दिवसभराचं कामकाज रोखण्यात आलं. विधानसभेला चोरांचं मंडळ का संबोधण्यात आलं याचा थोडा विचार हक्कभंग टाकणाऱ्या अशिष शेलार यांनी करायला हवा होता. आमदारांच्या एकूणच वर्तनावर लोक प्रतिक्रिया काय आहे, हे एकदा भाजप नेत्यांनी ऐकावी. कोण हे चोर, का त्यांना हे ऐकावं लागलं? यामागची पार्श्वभूमी शेलारांना ठावूक नाही, असं नाही. पण निमित्ताला कारण लागतं ते त्यांना मिळालं आणि त्यांनी महाराष्ट्र विधानसभेला दावणीला बांधलं.
लाज घालवणारी बाब म्हणजे शेलार यांच्या वक्तव्याला उचलून धरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राऊत यांना खडेबोल सुनावत आपल्यातलं भाजप प्रेम दाखवून दिलं. राऊत यांचं वक्तव्य हे शिवसेनेला रस्त्यावर आणणाऱ्यांसाठी होतं हे लपून राहणारं नव्हतं. आपलं जळतं तेव्हाच त्याची धग कळते. शिवसेनेला संपवणार्यांनी राष्ट्रवादीपुढे असं अव्हान उभं केलं असतं तर अजित पवारांनी काय केलं असतं? किती दुषणं संबंधितांना दिली असती? हीच गत भाजपवर आली असती तर त्या पक्षाची काय अवस्था झाली असती? सारा पक्ष संपवून उजळ माथ्याने सभागृहात बसणाऱ्यांचं भाजपने काय केलं असतं? राऊत यांनी व्यक्त केलेल्या भावना सत्ताधाऱ्यांना खटकणं स्वाभाविक आहे. कारण त्यांना साथ दिल्याविना भाजपची सत्तेची भूक त्यांना भागवता आली नसती. ती चोरांच्या साथीने भागल्यावर चोरांची बाजू घेतल्याविना भाजपपुढे पर्याय नव्हता. दुर्देवं वाटतं ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं. त्यांनीही शेलारांच्या वक्तव्याला उचलून धरत हक्कभंगाला पाठिंबा दिला.अनेकदा सभागृहात अजित पवार कोणाचे शरद पवारांचे की देवेंद्र फडणवीसांचे? असा प्रश्न पडतो. खरं तर पहाटेच्या शपथविधीचा इव्हेंट पार पडल्यावर झालेली बदनामी पुसून काढण्याची संधी पवार यांना अनेकदा मिळाली. पण त्यांनी या संधीचा फायदा घेतल्याचं दिसलं नाही. ज्या चोरांच्या मंडळाने पवारांना बोलतं केलं त्याच पवारांच्या विरोधी गटाला मुख्यमंत्री उघडपणे देशद्रोही म्हणतात याचं त्यांना काहीही वाटू नये?चहापानवेळी जी मुक्ताफळं मुख्यमंत्र्यांनी उधळली ती बहुतांश विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधातच होती. पवार यांच्याविरोधातील कथित सिंचन घोटाळ्याची टेप मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा वाजवली. आणि हे प्रकरण संपलं नाही, अशी धमकीही देऊन टाकली. मुख्यमंत्री शिंदेंचं हे फडणवीसांच्या पावलावरचं पाऊल आहे, हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ध्यानात घ्यावं. अन्यथा काळ सोकावेल...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai