Breaking News
विना निविदा विद्युत ठेकेदाराला पोल उभारण्याचे अतिरिक्त काम मंजूर
नवी मुंबई ः सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी आपल्या कार्यशैलीतून अनेक यशाच्या गुढ्या उभारल्या आहेत. आपल्या या यशाचे प्रदर्शन ते निरनिराळ्या नियतकालीकांतून व प्रसारमाध्यमातून करत असतात. अशाच एका कामाची गुढी त्यांनी 15 कोटीवरुन 75.26 कोटींवर नेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या राज्याचे लोकायुक्त संजय भाटिया करत असून या प्रकरणात सिडकोच्या दक्षता अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने या गुढी उभारण्यामागचे गुढ वाढले आहे.
सिडकोने खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा 18 होलांचा गोल्फ कोर्स बांधण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे सिडकोला फक्त 11 होल असलेला गोल्फ कोर्स बांधणे शक्य झाले होते. गोल्फ कोर्स बांधण्यातील अडचणी दूर झाल्याने सिडकोने पुन्हा उर्वरित गोल्फ कोर्सचे काम हाती घेतले आहे. परंतु, या कामात तेथे असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गोल्फ कोर्समधील पायाभुत सुविधांच्या विकासात अडथळा आणणाऱ्या 400 कि.व्ही. ईएचव्ही टॉवरचे स्थलांतरण करण्याचे काम हाती घेतले. सिडकोने सप्टेंबर 2021 मध्ये स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली व हे काम बीएनसी पॉवर प्रोजेक्टस लि. यांना 9 डिसेंबर 2021 रोजी देण्यात आले.
सदर काम सुरु करण्यापुर्वी सिडकोच्या नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी दौरा केला असता खारघरमध्ये अशाप्रकारच्या विद्युत पोलांनी सिडकोची मोठी जागा व्यापली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही जागा विकली असता सिडकोला 3 हजार 29 कोटी रुपये मिळतील असा प्रस्ताव त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संंचालक संजय मुखर्जींच्या निदर्शनास आणून दिले. सदर जागा मोकळी करण्यासाठी सिडकोने आहे त्या कामाचे स्वरुप वाढवून त्यात अतिरिक्त पोल उभारण्याची तरतूद केली. सुरुवातीला 15 कोटींचे असलेले हे काम आता 75.26 कोटींपर्यंत गेले असून त्यास सिडकोच्या संचालक मंडळाने 17 फेब्रुवारी 2022 रोजी तत्काळ मंजुरीही दिली आहे. सुरुवातीला या कामात 10 पोलांचे स्थलांतरण करण्याचे नियोजन केले होते. परंतु, नवीन कामात 35 पोलांचे स्थलांतरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वाढीव कामाचे सुधारित आदेश 21 मार्च 2022 देण्यात आले असून त्याअनुषंगाने ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुखर्जी यांच्या या निर्णयाला संदेश पाटील यांनी राज्याचे लोकायुक्त संजय भाटिया यांच्याकडे आव्हान दिले आहे. लोकआयुक्तांनी सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांसह व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना नोटीस बजावली आहे. मुखर्जी यांच्या या निर्णयावर लोकायुक्त कोणता निर्णय घेतात याकडे मुखर्जींसह विद्युत विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे