Breaking News
सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ; वाशी विभाग कार्यालय व नगररचना विभागाचे कारवाईसाठी एकमेकांकडे बोट
नवी मुंबई ः सिडकोने के.रहेजा कॉर्प यांना 2003 साली रहिवाशी व वाणिज्य वापरासाठी वाशी रेल्वे स्थानकासमोर 30 हजार चौ.मी. भूखंड वितरीत केला होता. या भूखंडाला पालिकेने 2005 साली बांधकाम परवानगी दिली त्यात 2986 चौ.मी. रहिवाशी क्षेत्रासोबत 6384 चौ.मी. हॉटेल क्षेत्र मंजुर केले होते. परंतु, सदर रहिवासी वापराच्या क्षेत्रात फोर्थ पॉईंट हे पंचतारांकित हॉटेल सुरु असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेली 14 वर्ष पालिकेच्या कर्तव्यदक्ष वाशी विभाग अधिकाऱ्यांनी याकडे कसे काय दुर्लक्ष केले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सिडकोने के.रहेजा यांना वाशी रेल्वे स्थानकासमोरील वितरीत केलेला भूखंड पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यापुर्वी सदर भूखंडाचे वितरण वादात सापडले होते, हे वितरण नियमबाह्य व बेकायदेशीर ठरवून मुंबई उच्च न्यायालयाने ते 2014 साली रद्द केले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशामुळे रहेजा ग्रुपला दिलासा मिळाला आहे. या याचिकेवरील अंतिम सुनावणी 2 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने ठेवली आहे. सिडकोचे भूखंड वितरण वादात सापडल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने दिलेली बांधकाम परवानगी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेने 2005 साली सदर भुखंडाला दिलेल्या बांधकाम परवानगीत 6384 चौ. मी. चे वाणिज्य क्षेत्र तर 2986 चौ.मी. चे रहिवासी क्षेत्र मंजुर केले होते. या इमारतीला डिसेंबर 2008 साली भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. ज्या इमारतीला महापालिकेने रहिवासी वापर मंजुर केला आहे, त्या इमारतीत सध्या फोर्थ पाँईट नावाचे पंचतारांकित हॉटेल रहेजा समुहाकडून सुरु आहे. या हॉटेलला पालिकेच्या परवाना विभागाने हॉटेल परवाना बहाल केला आहे. सदर इमारत रहिवासी वापरासाठी मंजुर केली असताना त्या इमारतीत पंचतारांकित हॉटेल सुरु असल्याची बाब पालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या नजरेस येऊ नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या वापराबाबत तक्रार प्राप्त होऊनही पालिकेच्या नगररचना विभागाने आणि वाशी विभाग अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता सदर तक्रार विभाग अधिकाऱ्यांकडे पाठवली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. तसेच विभाग अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क केला असता सदर इमारतीत कोणतेही बेकायदेशीर बांधकाम नसल्याचे थातुरमातूर उत्तर देण्यात आले. परंतु, रहिवासी वापरात सुरु असलेल्या पंचतारांकित हॉटेलबाबत पालिकेचे दोन्ही विभागाचे अर्थपुर्ण मौन वेगळाच संदेश देत आहेत. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर याबाबत कोणती भुमिका घेतात याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे