अदानी गृहप्रकल्पाचे भवितव्य अधांतरी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 31, 2023
- 742
बांधकाम याचिकेवरील निर्णयाच्या अधीन राहणार असल्याचे आदेश
नवी मुंबई ः नेरुळ सेक्टर 60 मधील पॉकेट डी आणि ई मध्ये मे. मेस्त्री कन्सट्रक्शनला सदर भुखंड सागरी किनारा क्षेत्र-1 मध्ये मोडत असताना सिडकोने नियमबाह्य बांधकाम परवानगी दिल्याने त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी 29 मार्च रोजी झाली असून न्यायालयाने सदर बांधकामाचे भवितव्य याचिकेवरील आदेशाच्या अधिन असल्याचे आपल्या आदेशात नमुद केले आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.
नेरुळ येथे सेक्टर 60 मध्ये सिडकोने 2004 साली गोल्फ कोर्स बांधण्याचे काम मे. मेस्त्री कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले होते. गोल्फ कोर्स विकसीत करण्याच्या बदल्यात पॉकेट डी आणि ई मधील सूमारे 27000 चौ. मी. च्या भूखंडावर रहिवाशी व वाणिज्य वापर करण्याची मुभा मे. मेस्त्री कन्सट्रक्शनला देण्यात आली होती. सदर भुखंड अदानी समुहाला मेस्त्री कंन्सट्रक्शन यांनी हस्तांतरीत केल्याचे बोलले जात आहे. प्रसारमाध्यमांवरही अदानी समुहाच्यावतीने सदर भुखंडावरील बांधण्यात येणाऱ्या सदनिका विकण्यासाठी जाहिरात करण्यात येत आहे.
सिडकोने सदर भूखंडावर रहिवाशी आणि वाणिज्य वापरासाठी बांधकाम परवानगी मे. मेस्त्री कंन्सट्रक्शन यांना दिली होती. या भुखंडावरील झाडे तोडण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीवरुन महापालिका आणि सिडको आमनेसामने आले होते. सिडकोने सदर गृहप्रकल्पास दिलेली बांधकाम परवानगी नियमबाह्य असतानाही महापालिकेने व नवी मुंबईचे कथित शिल्पकार म्हणून मिरवणाऱ्या राजकर्त्यांनी त्याबाबत अवाक्षरही काढले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर बांधकाम परवानगी ही सागरी किनारा क्षेत्र-1 मध्ये देण्यात आल्याचा आरोप करत तसेच सदर भुखंडालगत पाणथळ परिसर असून तेथे फ्लेमिंगोचा वावर असल्याचे सांगत सुनील अगरवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 29 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने सदर याचिका पुढील सुनावणीसाठी 25 एप्रिलला ठेवली आहे. या सुनावणीपुर्वी संबंधित पक्षकारांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात सदर भुखंडावरील बांधकाम हे या याचिकेवरील आदेशाच्या अधिन राहिल असे नमुद केल्याने अदानी समुहाच्या गृहप्रकल्पाचे भवितव्य आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे 25 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीकडे सिडकोसह अदानी समुहाचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai