Breaking News
पालिकेच्या अधिकाऱ्यांची ठेकेदारांवर अपार माया
नवी मुंबई ः महापालिकेच्या परवाना विभागाने परिमंडळ 1 व 2 मधील 3824 विद्युत खांबांवरील जाहिरातीतून वार्षिक 4 कोटी 70 लाख उत्पन्न गृहित धरले होते. परंतु 2020 पासून संबंधित ठेकेदारांनी पालिकेची देणी दिली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. तसेच ठेक्याची मुदत संपुनही जाहिरात प्रसिद्धी सुरुच असल्याने ठेकेदारांना कोट्यावधींचा नफा होत असून पालिकेला मात्र भोपळा मिळत असल्याने परवाना विभागातील अधिकाऱ्यांची ठेकेदारांवर अपार माया असल्याचे पालिकेत दबक्या आवाजात बोलले जात आहे.
नवी मुंबई महापालिकेने 2019 साली पालिका क्षेत्रातील 3824 विद्युत खांबांवरील किऑक्स जाहिराती प्रसिद्ध करण्याचे हक्क देण्याबाबत निविदा मागविल्या होत्या. पामबीच रोड, बेलापुर, नेरुळ नोडमधील मुख्य रस्ते व लगतच्या रस्त्यांवर 1571 तसेच दिघा-तुर्भे मुख्य रस्ता, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली नोडमधील 1025 विद्युत खांबांवर किऑक्स जाहिराती प्रसिद्ध करण्याचे हक्क वाशीतील मे. श्री ॲडव्हरटायझींग ॲण्ड मार्केटिंग प्रा.लि. यांना देण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी प्रथम वर्षासाठी 1 कोटी 23 लाख द्वितीय वर्षासाठी 1 कोटी 67 लाख 70 हजार तर तृतीय वर्षासाठी 3 कोटी 52 लाख 9988 रुपये पालिकेला देण्याचे कबूल केले होते. वाशी व तुर्भे विभागातील 1228 विद्युत खांबावरील किऑक्स जाहिराती प्रसिद्ध करण्याचे हक्क मे. प्रोॲक्टीव्ह इन अँड आऊट ॲडव्हरटायझिंग प्रा.लि. यांना देण्यात आले होते. सदर ठेकेदाराने प्रथम वर्षासाठी 54 लाख 33 हजार 333 रु., द्वितीय वर्षासाठी 99 लाख 33 हजार 333 रु. आणि तृतीय वर्षासाठी 1 कोटी 80 लाख 33 हजार 333 रु. पालिकेला देण्याचे ठरले होते.
मे. श्री ॲडव्हरटायझींग ॲण्ड मार्केटिंग प्रा.लि. यांनी प्रथम वर्षासाठी देय असलेली रक्कम भरली असून द्वितीय आणि तृतीय वर्षाची एकूण 5 कोटी 19 लाख 79 हजार 988 रुपये भरले नसल्याचे उपलब्ध नस्तीवरुन दिसत आहे. त्याचबरोबर मे. प्रोॲक्टीव्ह इन अँड आऊट ॲडव्हरटायझिंग प्रा.लि. यांनी प्रथम वर्षाची रक्कम व्यवस्थित भरली असून द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या एकूण रु. 2 कोटी 79 लाख 66 हजार 666 रक्कमेपैकी फक्त 24 लाख 83 हजार रुपयांचा भरणा पालिकेकडे केला आहे. उर्वरित रक्कम वसूल व्हावी म्हणून पालिकेच्या परवाना विभागाने संबंधित ठेकेदाराकडे पाठपुरावा केल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसत आहे. ठेकेदाराने सदर रक्कम न भरताही पालिकेने दोन्ही ठेकेदारांना पालिका क्षेत्रातील विद्युत खांबांवर जाहिराती लावण्यास मोकळीक दिली आहे. त्यामुळे या जाहिरातीतून ठेकेदारांना जरी कोट्यावधी रुपये वर्षाकाठी मिळाले असले तरी पालिकेला मात्र भोपळा मिळाल्याची चर्चा सुरु आहे. सदर ठेक्यांची मुदत 10 मार्च 2022 रोजी संपली असून गेले वर्षभर महापालिका क्षेत्रातील विद्युत खांबांवरील जाहिरातींचा ओघ तसाच सुरु आहे. परवाना विभागातील अधिकाऱ्यांची ठेकेदारांवरील अपार मायेमुळे ठेकेदार बिनदिक्कत जाहिरात करत असल्याचे पालिकेत बोलले जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे