एपीएमसीच्या 8 संचालकांना कारणे दाखवा नोटीस
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 14, 2023
- 494
18 एप्रिलपर्यंत संबंधित संचालकांनी लेखी अभिप्राय देण्याचे पणन संचालकांचे आदेश
नवी मुंबई : अनेक महिन्यांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने एपीएमसीतील विकासकामांना त्याचा फटका बसत आहे. सेच गणपुर्ती अभावी बैठकाही ठप्प आहेत. त्यामुळे संचालक मंडळातील सदस्यांकडे सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नसल्याचे नमूद करीत, संचालक मंडळ बरखास्त का करू नये? याबाबत 8 संचालकांना कारणे दाखवा नोटीस पाठवून 18 एप्रिल पर्यंत लेखी खुलासा मागविण्यात आलेला आहे.
आधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील 7 संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. या दरम्यान सभापती अशोक डक व उपसभापती धनंजय वाडकर यांनी डिसेंबर अखेर पदाचा राजीनामा दिला होता. शिवाय त्यानंतरच्या कालावधीत आणखी 3 सदस्य तांत्रिक दृष्टीने अपात्र ठरले. नियमानुसार बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठका होण्यासाठी 18 पैकी 11 संचालक असतील तरच गणपूर्ती पूर्ण होते. मात्र सध्या स्थितीत एपीएमसी बाजारात 18 पैकी 10 सदस्य अपात्र ठरले असून केवळ 8 सदस्य संचालक मंडळावर आहेत. त्यामुळे संचालक मंडळाची गणपूर्ती पूर्ण होत नसल्याने बैठका ठप्प आहेत. परिणामी धोरणात्मक निर्णयाला देखील खीळ बसली आहे. तर संचालकांच्या अपात्रेबाबत शासन दरबारी व न्यायालयात सुरु असलेली सुनावणी सुरू असून तारखांवर तारखा पडत आहेत.
18 संचालकांपैकी 10 संचालक अपात्र झाल्याने आणि संचालक मंडळातील सदस्यांकडे सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नसल्याचा निष्कर्ष काढत पणन संचालक विनायक कोकरे यांनी संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये? अशी विचारणा या संचालकांना केली आहे. तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या संचालकांची संख्येमुळे बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू नसल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया पणन संचालनालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत पणन संचालकांनी 8 संचालकांकडून 18 एप्रिल पर्यंत लेखी खुलासा मागविला आहे. त्याचबरोबर बाजार समिती बरखास्त करून त्यावर शिवसेना-भाजपचे प्रशासकीय मंडळ आणून आर्थिक सत्ता केंद्र ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरु आहे.
- समाधानकारक खुलासा आवश्यक
बाजार समितीशी संबंधित घटकांच्या व शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने कामकाज करणेकरीता गणपूर्तीअभावी तसेच समिती सदस्यावर सोपविलेली कर्तव्य पार पाडण्यास बाजार समिती असमर्थ असल्याने आणि त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या सक्षम नसल्याने, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे अधिक्रमण करणे आवश्यक झाले आहे. या संचालकांनी समाधानकारक खुलासा न केल्यास पणन कायद्यानुसार कारवाईचा इशारा दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai