Breaking News
12 वर्षानंतर काढलेली निविदा 15 कोटींनी कमी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांच्या सफाईसाठी 2011 साली 62 कोटींचे काम दोन ठेकेदारांना दिले होते. परंतु आता एप्रिल 2023 मध्ये त्याच कामासाठी शहर अभियंता विभागाने 50 कोटींची निविदा काढली आहे. मात्र 12 वर्षानंतर काढलेली निविदा 15 कोटींनी कमी असल्याने आधीच्या कामात कोट्यावधींचा घोटाळा झाला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे यांत्रिकी पद्धतीने पालिकेच्या तिजोरीची सफाई करणाऱ्या या निविदेची संपुर्ण चौकशी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
नवी मुंबई महापालिकेने पालिका क्षेत्रातील परिमंडळ 1 व 2 भागातील रस्त्यांची सफाई करण्यासाठी स्विपींग मशिन वाहन खरेदी व 7 वर्ष देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. परिमंडळ 1 साठी 27.87 कोटी तर परिमंडळ 2 साठी 23.64 कोटी रुपयांची ही निविदा असून यामध्ये संपुर्णपणे आयात केलेल्या वाहनांचा पुरवठा करण्याची अट टाकली आहे. ही निविदा प्रक्रिया नवी मुंबई शहर अभियंता विभागाकडून राबविण्यात येत आहे. यापुर्वी 2011 साली अशाच प्रकारची निविदा प्रक्रिया महापालिकेने जेएनएनआरयुएम उपक्रमाअंतर्गत राबविली होती. त्यावेळी परिमंडळ 1 चे काम अँथोनी वेस्ट हँडलिंग सेल प्रा.लि. यांना 30.87 कोटी तर परिमंडळ 2 चे काम मे. बीव्हीजी इंडिया लि. यांना 32.57 कोटी रुपयांना देण्यात आले होते.
जुलै 2010 साली प्रथम राबविलेल्या निविदा प्रक्रियेत अँथोनी वेस्ट हँडलिंग सेल प्रा.लि.यांनी 18.45 कोटी तर बीव्हीजी इंडिया लि. यांनी 19.36 कोटी रुपयांची निविदा भरली होती. सदर निविदेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने तत्कालीन आयुक्त विजय नाहटा यांनी निविदा प्रक्रिया रद्द केली व सप्टेंबर 2010 मध्ये दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. दुसऱ्यांदा काढलेल्या निविदेत संबंधित ठेकेदारांनी प्रत्येकी 43.99 कोटींची बोली लावल्याने तत्कालीन आयुक्त नाहटा यांनी पुन्हा निविदा प्रक्रिया रद्द केली. नवी मुंबईतील एका राजकीय नेत्याच्या दबावाने सदर कामाचे परिमंडळ 1 व परिमंडळ 2 असे दोन तुकडे करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी मे. अँथोनी वेस्ट हँडलिंग सेल प्रा.लि. ने 30.95 कोटींची तर बीव्हीजी इंडिया प्रा. लि. यांनी 32.57 कोटींची बोली लावली. सप्टेंबर 2010 ते डिसेंबर 2010 या चार महिन्यात त्याच ठेकेदारांनी 43.99 कोटी रुपयांवरुन 63.52 कोटी रुपयांपर्यंत निविदा फुगवली. एवढ्या मोठ्या फरकाला पालिकेच्या शहर अभियंता, लेखा विभाग, लेखा परिक्षण विभाग व स्थायी समितीने कशी मान्यता दिली याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सन 2012-13 मध्ये शासनाच्या स्थानिक लोकलेखा निधी विभागाने याचे लेखापरिक्षण केले असता संबंधित ठेकेदारांना पालिकेने 28.93 कोटी रुपये अतिरिक्त दिल्याची नोंद आपल्या अहवालात घेतली होती. 12 वर्षांनंतर त्याच कामासाठी पालिकेने नव्याने काढलेली निविदा ही 50 कोटींची असल्याने तत्कालीन लेखापरिक्षकाने लेखापरिक्षणात नोंदविलेले आक्षेप तंतोतंत खरे ठरत आहेत. ‘आजची नवी मुंबई'ने ही याबाबत वृत्त प्रसिद्ध करुन या महाघोटाळ्याकडे पालिकेचे लक्ष वेधले होते. परंतु, आयुक्तांसह पालिकेच्या लेखा परिक्षण विभाग किंवा घनकचरा विभागाने याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने ‘हमाम मे सब नंगे' असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. विद्यमान आयुक्त या महाघोटाळ्याची दखल घेतील अशी अपेक्षा नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत.
तिजोरीची सफाई यांत्रिकी पध्दतीने
घोटाळयाची व्याप्ती वाढण्याची शक्यता
महापालिकेने रस्त्याच्या यांत्रिकी सफाईसाठी वापरलेल्या गाडया या रस्त्यावरील धूळ सफाईसाठी वापरल्या जात होत्या. परंतु त्या गाडया पावसाळयातील चार महिन्यांमध्ये पालिकेच्या घनकचरा विभागाने वापरून महिना सरासरी पन्नास लाख रूपये म्हणजेच वार्षिक दोन कोटी रूपये ऐवढी रक्कम ठेकेदारांना अदा केली आहे.
पावसाळयात रस्ते ओले असल्याने तसेच पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील धुळ साफ होत असताना पालिका अधिकाऱ्यांनी या गाडया सफाईसाठी कशा वापरल्या हेही गुढ आहे. गेल्या बारा वर्षांचा हिशोब केल्यास हि रक्कम 25 कोटींपर्यंत जाते. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी झाल्यास या घोटाळयाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाकाळातही कर्फ्यू लॉकडाऊन असताना तसेच महत्वाच्या रस्त्यांवर बॅरिकेट असताना पालिकेने या गाडया वापरून ओसाड रस्त्यांची सफाई करत ठेकेदारांना दोन कोटी रूपये अदा केले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai