सिडको व्यवस्थापकीय संचालकांचे घुमजाव
- by संजयकुमार सुर्वे
- Apr 21, 2023
- 669
विद्युत पोल उभारण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविणार
नवी मुंबई ः सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक यांनी 15 कोटींच्या कंत्राटात त्याच ठेकेदाराला अतिरिक्त 60 कोटींचे काम देण्याचा निर्णय घेतला होता. मुखर्जी यांच्या या तुघलकी निर्णयाचे वृत्तांकन ‘आजची नवी मुंबई' ने करुन या अनियमिततेला वाचा फोडली होती. याबाबत लोकायुक्तांकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. हा निर्णय चांगलाच अंगलट येण्याच्या शक्यतेने मुखर्जी यांनी घुमजाव करत निविदाच रद्द करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
सिडकोने खारघर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोल्फ कोर्स विकासाच्या कामात अडथळा ठरत असणारे 400 कि.व्ही. ईएचव्ही विद्युत पोल हटविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. हे काम बीएनसी पॉवर प्रोजेक्टस लि. यांना 15 कोटी रुपयांना 9 डिसेंबर 2021 रोजी देण्यात आले होते. काम सुरु करण्यापुर्वी नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी खारघर येथे दौरा केला असता अनेक विद्युत पोलांनी सिडकोची मोठी जागा व्यापली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या जागेची विक्री केल्यास सिडकोला 3 हजार 29 कोटी रुपये उपलब्ध होतील ही बाब त्यांनी मुखर्जींच्या निदर्शनास आणून दिली. सिडकोने नेहमीच्या पद्धतीने विद्युत पोल उभारण्याऐवजी तेथे नवीन तंत्रज्ञानाने मोनोपोल या प्रकारचे विद्युत पोल उभारण्याचा निर्णय घेतला. हे पोल कमी जागा व्यापत असल्याने आणि विद्यमान विद्युत वाहिन्यांचे स्थलांतरण केल्यास सिडकोला 3 हजार कोटी रुपये मिळणार होते.
या कामासाठी सिडकोच्या विद्युत विभागाने अतिरिक्त 25 मोनोपोल टाकण्याचे नवीन काम या निविदेत प्रस्तावित केले होते. त्याची किंमत 60 कोटींहुन अधिक असल्याने सिडकोला नियमानुसार नव्याने निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. मुखर्जी यांनी सदर कामाची प्रशासकीय मान्यता 16 कोटींवरुन 75.26 कोटींपर्यंत वाढवली आणि सदर काम त्याच ठेकेदाराकडून करुन घेण्याचा निर्णय घेतल्याने नवी मुंबईत मोठा गहजब झाला. मुखर्जी यांच्या या तुघलकी निर्णयाचे वृत्तांकन आजची नवी मुंबईने करुन या कामाच्या अनियमिततेकडे नवी मुंबईकरांचे लक्ष वेधले. त्याचवेळी काही सामाजिक संघटनांनी राज्याचे लोकआयुक्त संजय भाटिया यांच्याकडे तक्रार दाखल करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. अखेर संजय मुखर्जी यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करत सदर काम रद्द करण्याचे आदेश 31 मार्च 2023 रोजी दिले. याबाबतचे पत्र संबंधित ठेकेदाराला पाठविण्यात आल्याचे सुत्रांकडून कळत आहे.
- लोकायुक्तांचा धसका
1. संजय मुखर्जी यांच्या या निर्णया विरुद्ध राज्याचे लोकायुक्त संजय भाटिया यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. संजय भाटिया हे यापुर्वी सिडकोमध्ये 2014 ते 2016 या कालावधीत व्यवस्थापकीय संचालक होते.
2.सिडकोच्या कार्यपद्धतीबाबत भाटिया चांगलेच अवगत असल्याने याप्रकरणात चौकशीचे आदेश झाल्यास त्याचा फटका आपल्या पुढील प्रशासकीय कारकीर्दीला बसू शकतो या जाणिवेने मुखर्जी यांनी ही निविदा रद्द करुन नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
निविदेचा प्रवास
- 9 डिसेंबर 2021 रोजी मे. बीएनसी पॉवर प्रो. लि. यांना 15 कोटींचा कार्यादेश
- काम पुर्ण करण्यास 9 सप्टेंबर 2022 ची मुदत
- कामामध्ये 400 केव्हीए ची विद्युत वाहिनीसह 10 विद्युत पोल उभारण्याचे कंत्राट
- 60 कोटींच्या अतिरिक्त कामात 25 मोनोपोल उभारण्याच्या कामाचा समावेश
- 21 मार्च 2022 रोजी 75.26 कोटींचे सुधारित कार्यादेश व काम पुर्ण करण्यास 31 मार्च 2023 पर्यंत मुदत
- लोकायुक्तांकडे या नियमबाह्य कामाबाबत संदेश पाटील यांची तक्रार व सुनावणी
- विहीत मुदतीत काम पुर्ण न केल्याचा ठपका ठेवून काम रद्द करण्याचे सिडकोचे आदेश
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे