Breaking News
भूक लागली की नेहमी जेवण असावंच असं काही नाही. कधी कधी चटपटीत वडापाव, पॅटीस, भजी, भेळ असलं काही असलं तरी एक वेळची भूक समाधानात भागते. कधी पॅटीस कधी वडापाव, समोसे तर कधी भजी हे सर्वसामान्यांकरिता एका मेजवानी पेक्षा कमी नसतं. अनेकदा सेलिब्रिटी, उच्चभ्रू व्यक्ती ही या पदार्थांच्या प्रेमात पडलेली दिसतात. त्यातच एखाद्य ठिकाण जर चवीचे माहेरघर असेल तर ते प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही. आणि आजकाल तर व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांच्या सहाय्याने अशा ठिकाणांच्या प्रसिद्धीचा झंजावातच तयार होतो. आजचं ठिकाण आहे गगन फूड्स. हे कुठे आहे म्हणाल तर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर. काही ठिकाणं अल्पावधीतच प्रसिद्धीस येतात. त्यापैकी हे एक. यावर्षी गुढीपाडव्याला विजय चांदोरकर आणि राकेश विजयानंद मोरे या दोघांनी वाशी सेक्टर 16 येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाजूला गगन फूड्स नावाने सुरू केलेल्या फूड ट्रक वरील ब्रेड पॅटीस आणि वडापावला खवय्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेतून सुरू केलेला हा उपक्रम 'स्वाद आणि गुणवत्ता एकाच ठिकाणी' या त्यांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे चालत असल्यामुळे ग्राहकवर्ग चांगलाच खेचला जात आहे. येथील ब्रेड पॅटीस आणि वडापावची चव ग्राहकांच्या मनात खोलवर रुजत आहे. त्याचबरोबर येथे घेण्यात येणारी स्वच्छतेची काळजी सुद्धा मनाला समाधान देऊन जाते. सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत या ठिकाणी ब्रेड पॅटीस, वडापाव, बटाटा भजी, कांदा भजी, चायनीज रोल, ढोकळा इत्यादी पदार्थ मिळतात. यावेळेत सुमारे 350 ते 400 ग्राहक चवीच्या ओढीने येतात. वरील सर्व पदार्थ बनविण्यासाठी चांगल्या व उच्च प्रतीच्या वस्तू वापरल्या जातात, तसेच ग्राहकांना पाणी सुद्धा फिल्टर केलेलेच दिले जाते असे मोरे यांनी सांगितले. 4 कामगारांच्या साह्याने चालवल्या जाणाऱ्या गगन फूड्सचे सेंट्रल किचन वाशीतील सेक्टर 1 मध्ये आहे. अधिकाधिक ग्राहकांना या पदार्थांची चव चाखता यावी याकरिता लवकरच दुसरा फूड ट्रक सुरू करणार असल्याचा मानस मोरे यांनी व्यक्त केला. आसपासच्या अनेक कार्यालयांमधून तसेच दुकानांमधून या ठिकाणीच्या ब्रेड पॅटीस व वडापावला मोठी मागणी असते. मागणीची अधिक मात्रा असल्यास फ्री होम डिलिव्हरी सुद्धा करण्यात येते. तर मग वेगळी चव चाखावयाची इच्छा असेल तर या ठिकाणी तुम्हाला भेट द्यावी लागेल.
ठिकाण : शेरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बाजूला, सेक्टर 16, वाशी, नवी मुंबई.
काय खाल : ब्रेड पॅटीस, वडापाव, बटाटा भजी, कांदा भजी, चायनीज रोल, ढोकळा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे