Breaking News
सकाळचा ऐनवेळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची हलकीशी पोटपूजा असो अशावेळी आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची जागा अधिकतर चटकदार समोसे, वडापाव, मूंगभजी, कांदा भजी यांनीच भरून काढली जाते. त्यातच पंजाबी समोसे असतील तर मन तृप्त होऊन जाते. आज तुम्हाला अशा ठिकाणची माहिती देणार आहोत ज्या ठिकाणचे समोसे आणि मूंगभजी खवय्यांच्या चांगलीच पसंतीस उतरलेय. वडापावच्या चाहत्यांसोबत मुंगभजीवर सुद्धा तुटून पडणारे खवय्यें मोठ्या संख्येने आहेत याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी पहावयास मिळते. वाशी, सेक्टर 15 मधील महा-ई-सेवा केंद्राच्या समोर हातगाडीवर मिळणाऱ्या मुंगभजी आणि समोस्यांच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. 27 वर्षांपासून खवय्यांच्या सेवेत असणाऱ्या निलेश वडापाव सेंटरवर संध्याकाळी खवय्यांची गर्दी संपता संपत नाही. 1997 साली खंडू उंडे यांनी सुरू केलेल्या या सेंटरवर त्यांचा मुलगा निलेश उंडे हे दोन मदतनिसांच्या साह्याने येथे येणाऱ्या ग्राहकांची छोटी भूक भागवतात. वडापाव, समोसे, मुंगभजी या पदार्थांना लागणारी हिरवी चटणी, लाल तिखट चटणी, सुकी चटणी, गोड चटणी जिभेवर कमालीचा स्वाद निर्माण करते. या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जाते. इथल्या मूंगभजीसोबतच वडापाव, समोस्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर संध्याकाळी 4.30 ते रात्री 10 वाजेदरम्यान यावे लागेल. या वेळेत या ठिकाणी दरोरोज जवळपास 400 ते 500 खवय्ये या चविष्ट पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी येत असतात, असे निलेश यांनी सांगितले. या पदार्थांची चव फक्त सेक्टर 15 मधील आबालवृद्धांपर्यंतच मर्यादित राहिली नसून वाशी, तुर्भे, कोपरखैरणे परिसरातील अनेक जण मूंगभजी आणि समोस्याच्या चवीने येथे आपोआप ओढले जातात. येथे येणाऱ्या चाहत्यांकडून फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून येथे मिळणाऱ्या पदार्थांवर अनेक सकारात्मक व्हिडिओ प्रसारित केले गेले आहेत. त्यांना 'लाईक' ही मोठ्या प्रमाणात मिळाल्याने दिवसेंदिवस इथला खवय्या वर्ग वाढला आहे. मूंगभजी, समोस्याची अस्सल चव चाखायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी यावं लागतंय अन्? ते ही हलकीशी भूक घेऊनच.
ठिकाण : महा-ई-सेवा केंद्रासमोर, सेक्टर 15, वाशी, नवी मुंबई.
काय खाल : मूंगभजी, समोसे, वडापाव
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे