Breaking News
विद्यमान राज्य सरकारच्या काळात सभ्य चेहऱ्याच्या खंडणीखोरांची चलती आहे. या खंडणीखोरांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला असेल, त्यांना आत टाकण्यासाठी मदत केली असेल, त्यांच्या सरकारला बदनाम केलं असेल तर अशा बदमाशांचं पुनर्वसन करण्याची या सरकारची तयारी दिसते आहे. सत्तेच्या विकृतीचा हा परिपाक होय. अशाच चेहऱ्यातील समीर वानखेडे यांचा उपद्य्वाप आपण पाहातोच आहोत. या वानखेडेंविषयी आपण पुढे पाहणारच आहोत. अशा सभ्य चेहऱ्यामागचा आणखी एक खंडणीखोर या राज्यात उजळ माथ्याने वावरणार आहे. परमवीर सिंग असं त्याचं नाव. असंख्य प्रकरणांमागचा मास्टरमाईंड असलेला आणि विविध गुन्ह्यांचा पाठिराखा म्हणून ओळखला जाणारा म्हणून परमवीर यांच्याकडे पाहिलं जातं. याच परमवीर यांच्याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांची शहानिशा करायची झाली तर परमवीर यांचं निलंबन मागे का आणि कसं घेण्यात आलं हे सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्याविषयीच्या तक्रारी थेट लोकसभा अध्यक्षांबरोबरच देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यापर्यंत जात असतील तर त्याच्या एकूणच कारभाराची चौकशी होणं आगत्याचं असताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना क्लिनचिट देत त्यांचा सेवाळाळ भरून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वादग्रस्त आहेच, पण राज्यात नैतिकतेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अन्याय करणारा आहे, असं म्हटलं तर वावगू ठरणार नाही.
सिंग यांना क्लिनचिट देण्याच्या निर्णयाची पोलखोल करताना पटोले यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा संदर्भ दिला. परमवीर यांच्या विरोधातील असंख्य तक्रारींची माहिती स्वत: ओम यांनी आपल्याला दिली आणि इतका भ्रष्टाचारी अधिकार सेवेत राहू कसा शकतो, असा सवाल बिर्ला यांनी आपल्याला केल्याची माहिती पटोले यांनी दिली. सिंग यांच्या भ्रष्ट कारभाराची फाईल ही लोकसभा अध्यक्षांशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही पाठवण्यात आल्याची ही माहिती केवळ त्यांनी तोंडदेखली पुढे केली असं नाही तर राज्य विधानसभेचे अध्यक्ष असतानाही त्यांनी याबाबतची वाच्यता केली. विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस या अधिकाऱ्याची कशी पाठराखण करतात याचीही पोलखोल तेव्हा अध्यक्षीय खुर्चीवरून केला होता. ज्या अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर दर तीन महिन्यात त्याचं पुनरावलोकन करण्याचे न्यायालयाने आदेश देऊनही शिंदे सरकारने आणि फडणवीसांच्या गृह खात्याने वर्षभरात एकदाही पुनरावलोकन केलं नाही. उलट आज त्याच सिंग यांना निर्दोषत्व बहाल करत फडणवीस यांनी सिंग यांना बक्षीस दिलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कर्दनकाळ म्हणून ज्या काहींचा उल्लेख केला जातो त्यात सिंग यांचा समावेश आहे. हे सरकार राज्याच्या सत्तेवर येताच या सरकारला पायउतार करण्यासाठी फडणवीस कंपूने अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण केलं. सिंग यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या असंख्य आरोपांची दखल घेत महाविकास आघाडीने आणि त्या सरकारचे गृहमंत्री असलेल्या अनील देशमुख यांनी सिंग यांच्याकडील मुंबईचं पोलीस आयुक्तपद काढून घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाविकास आघाडी आणि सरकारमधील गृहमंत्री अनील देशमुख हे सिंग यांचे दुष्मन बनले. दुष्मनाचा दुष्मन हा आपला मित्र असतो, तसं त्यांची गट्टी महाविकास आघाडीचे विरोधक असलेल्या देवेंद्र फडणवीसांशी झाली. आपल्या अपेक्षेप्रमाणे सिंग काम करत असल्याचं पाहून केंद्राच्या मदतीने सिंग यांचे सारे दरवाजे मोकळे करून देण्यात आले. दरम्यान गृहमंत्री अनील देशमुख यांच्या विरोधात त्यांनी 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री असलेल्या उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. ईडीने याचा गैरफायदा घेतला आणि देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आता या आरोपात तथ्य नसल्याची बाब पुढे आली आणि देशमुखांना जामीन मिळाला.
देशमुखांचं हे प्रकरण घडण्याआधी मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया या इमारतीच्या परिसरात जिलेटीन या स्फोटकांची गाडी पार्क केल्याचं प्रकरण पुढे आलं. कमाईचा हा बनाव इतका गंभीर होता की यात जो कोणी असेल त्याच्याविरोधात देशद्रोहासारखाच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण त्या प्रकरणाची साधी चौकशी तरी झाली का असा प्रश्न पडतो. मुकेश अंबानी यांना त्यांच्या विविध उद्योगांकडे जाण्यासाठी ॲन्टेलियावरून हॅलिकाप्टर उडवण्याची परवानगी हवी होती. या परवानगीसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पुर्तता करून घेण्याची जबाबदारी सचिन वाझे या आणखी एका बदमाश पोलीस अधिकाऱ्याकडे होती. यात कित्तेक कोटींची कमाई दडली होती. ज्यात पुढे मनसुख हिरेन यांना आपले प्राण गमवावे लागले. या प्रकरणाची सीबीआयसारख्या तपास यंत्रणेकरवी चौकशी झाली असती तर सिंग आणि वाझे यांची अवस्था काय झाली, हे इथे सांगायची आवश्यकता नाही.
ॲन्टेलियाच्या परिसरातील स्फोटकांचा बनाव इतक्या सोपस्काराने पुढे केला जात होता, विधानसभेत फडणवीस यांच्याकडून दिली जाणारी माहिती ही ठरवून तयार केलेली स्क्रीप्ट असल्याचा शेरा तेव्हा अध्यक्षीय खुर्चीवरून पटोले यांनी मारला होता. पुढे गृहमंत्र्यावरही खोटे आरोप करत या अधिकाऱ्याने महाराष्ट्राची उभ्या देशात बदनामी केली. याची तरी लाज या सत्ताधाऱ्यांना हवी होती. परमवीर यांनी केलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या चांदिवाल आयोगापुढच्या सुनावणीत वाझे याने अनील देशमुख यांनी पैसे वसुलीचे कोणतेही आदेश दिले नसल्याचं सांगून स्वत:लाच खोटं पाडलं. यावरून या दोघांनी केलेल्या आरोपांमागे केवळ सरकारच्या बदनामीचं सत्र असल्याचं स्पष्ट झालं. ज्या परमवीर यांना क्लिनचिट देण्यात आली त्या सिंग यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींची शहानिशा झाली असती तर कोणाही शहाण्याने त्यांना निर्दोष सोडलं नसतं. परमवीर यांच्या पत्नीचं इंडिया बूलमध्ये कार्यालय कसं आलं इथपासून त्यांच्या रोहन नामक मुलाचा सिंगापूरपर्यंत उद्योग केवळ भ्रष्ट पैशातून झाल्याचा आरोप केला जात होता. नवी मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये सिंग यांच्या विरोधात खंडणी वसुलीच्या आठ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे गुन्हे दाखल झाले तेव्हा ते काही महिने फरारीही होते. असंख्य आरोपांची मालिका असलेल्या सिंग यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. देवाशिष चक्रवर्ती यांच्या पुढाकारात चौकशी समितीने आपल्या अहवालात कारवाईचं समर्थन केलं. त्याच परमवीर यांना निलंबित काळातील वेतन आणि इतर भत्ते देण्याची घोषणा करून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रावर उपकारच केले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai